जगण्यावर तेजाची लेणी खोदणारे 'हेमंतराव'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:22+5:302021-09-09T04:19:22+5:30
------------ विज्ञान आणि व्यवस्थापन या विषयांच्या अभ्यासाचा पाया रचून, राजकारणी वातावरणातही लेखन नाट्यकलेची सर्जनशील पेरणी करणारे असे एक आदरणीय ...
------------
विज्ञान आणि व्यवस्थापन या विषयांच्या अभ्यासाचा पाया रचून, राजकारणी वातावरणातही लेखन
नाट्यकलेची सर्जनशील पेरणी करणारे असे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे हेमंतराव टकले!
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा लाभलेला सहवास हा त्यांच्या जीवनातील भाग्ययोग आणि संचित आहे. एक प्रथितयश अभिनेते म्हणून त्यांनी इतिहास घडविला. राज्यनाट्य स्पर्धेतील तसेच व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांनी अभिनीत केलेल्या अनेक भूमिकांना पुरस्कार मिळाले. एकच प्याला, डोंगर म्हातारा झाला, कोपता वास्तुदेवता अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका अजूनही रसिकांच्या लक्षात आहेत.
कुसुमाग्रजांच्या कविता या त्यांच्यासाठी ‘तेजाची लेणी' आहेत आणि तीच त्यांनी जीवननिष्ठा मानली. नॅब या संस्थेच्या माध्यमातून हेमंतरावांनी अशा अनेकांपर्यंत प्रकाशाचे किरण पोहोचविले आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि राज्य कामगार कल्याण मंडळ या मंडळांवरील संचालक म्हणून त्यांनी घेतलेले अनेक विकासात्मक निर्णय हे महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देणारे ठरले आहेत. त्यांचे लेखन वाचकप्रिय ठरले आहे. 'जनातलं मनातलं', ‘थोडी ओली पाने’ हे ललितलेखांचे पुस्तक असो किंवा राष्ट्रवादी मासिकातले ‘शेवटचं पान', यातून त्यांच्यातील प्रतिभावंत लेखक वाचकांसमोर येतो. राष्ट्रवादी मासिकाचे व्यवस्थापकीय संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खजिनदार अशी दुहेरी ‘अक्षर-धना'ची जबाबदारी आपली निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या समन्वयातून सांभाळत आहेत.
विधान परिषदेतील कार्यक्षम आमदार म्हणून हेमंतरावांची कारकीर्द उल्लेखनीय व आदर्शवत ठरली आहे. कुसुमाग्रज स्मारकाच्या उभारणीसाठी असलेला त्यांचा मोलाचा सहभाग आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे कोषाध्यक्ष, लोकहितवादी मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान अशा अनेक लोकाभिमुख जनचळवळीत अग्रेसर असलेली हेमंतरावांची वाटचाल सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातील 'हार्मनी' निरंतर राहो या शुभेच्छा!
- विश्वास जयदेव ठाकूर
कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक