सरदवाडी येथे बिबट्याने पळवला बोकड
By admin | Published: March 5, 2016 11:03 PM2016-03-05T23:03:26+5:302016-03-05T23:04:04+5:30
बंदोबस्ताची मागणी: दोन महिन्यांपासून परिसरात दहशत कायम
सरदवाडी : सिन्नर तालुक्यातील सरदवाडी शिवारात चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपातून बिबट्याने बोकड उचलून नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सरदवाडी गावाच्या पश्चिमेला वन विभागाचे जंगलक्षेत्र आहे. याच भागातील पांगरवाडीत राहणाऱ्या लक्ष्मण कुंवर यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असून, त्यांच्याकडे लहान-मोठ्या अशा सुमारे ५० शेळ्या आहेत. शुक्रवारी नेहमीप्रमाणे कुंवर दांपत्य जंगलालगत शेळ्या चारत होते. यावेळी दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक कळपातील पूर्ण वाढ झालेल्या बोकडावर झडप घालून त्याला जंगलाकडे पळवून नेले. ही घटना कुंवर दांपत्यासमोर झाल्याने त्यांची भीतीपोटी पाचावर धारण बसली. जंगलाकडे बोकड घेऊन जात असलेल्या बिबट्याकडे ते हताशपणे बघत राहिले. डोळ्यांदेखत अवघ्या काही फुटांच्या अंतरावर हा थरार पाहिलेल्या कुंवर यांनी कळप घेऊन घराकडे जाणे पसंत केले.
बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. घनदाट जंगल, मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत आणि बिबट्याचे वर्णन ऐकल्यानंतर युवकांनी भीतीपोटी बोकडाचा शोध घेण्याचा विचार सोडून दिला. शनिवारी सदर घटनेची माहिती सिन्नर येथील वन विभागास कळविल्यानंतर कार्यालयाकडून बिबट्याने खाल्लेल्या बोकडाचे अवशेष किंवा त्याचे फोटो काढून आणण्यास कर्मचाऱ्यांनी सुचविले, असे कुंवर यांनी सांगितले.
महिनाभरापूर्वी सरदवाडी गावालगत माजी सरपंच बजुनाथ सिरसाट यांच्या उसाच्या शेतात बिबट्याने ठाण मांडले होते. सदर ऊस तोडल्यानंतर बिबट्याने आपला मुक्काम गावाच्या पश्चिमेकडील वन विभागाच्या जंगलात हलवला आहे. या कालावधीत बिबट्याने अनेक कुत्रे व कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. शेतात काम करणाऱ्या अनेक शेतमजुरांना अनेकवेळा बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)