विल्होळी येथील पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:50 PM2017-08-14T14:50:49+5:302017-08-14T14:53:47+5:30
नाशिक : दारुच्या व्यसनापायी पत्नीचा छळ करून तीला जाळून मारणाºया आरोपी पती सागर दामोदर झोले (२६) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महादरवाजाची मेठ येथील रहिवासी असलेला झोले हा विल्होळी येथील सासुरवाडीमध्ये पत्नी दोन लहान मुले व सासूसोबत राहत होता. दारुच्या आहारी गेलेल्या झोले याने सातत्याने पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरुन छळ के ला. त्यामुळे पत्नीने त्याच्याविरुध्द अनेकदा तक्रारी केल्या. २३ नोव्हेंबर २०१५ रोजी त्याने पत्नी पुजाला पहाटेच्या सुमारास जाळून हत्त्या केली. हत्त्येनंतर झोले फरार झाला होता. त्याच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यास अटक करुन न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने सुरूवातीला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी (दि.१४) प्रधान न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, सरकारी वकील अॅड. विद्या जाधव यांनी सरकार पक्षाकडून युक्तीवाद करत अकरा साक्षीदार तपासले. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी नऊ ते दहा वर्षीय भाचीची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. न्यायाधीश शिंदे यांनी या खटल्याचा फैसला अवघ्या तीन सुनावण्यांमध्ये केला.