वनौषधी उद्यानाचे काम प्रगतिपथावर
By admin | Published: October 26, 2016 11:55 PM2016-10-26T23:55:59+5:302016-10-26T23:56:59+5:30
राज ठाकरेंचा प्रकल्प : प्रवेशद्वारासह संरक्षित कुंपणाची उभारणी
नाशिक : पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू वनोद्यानात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनपर साधनांसह साकारण्यात येणाºया वनौषधी उद्यानाचे काम प्रगतिपथावर असून, सुमारे २३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे आकर्षक प्रवेशद्वार, सोलर इलेक्ट्रिक तारांचे संरक्षित कुंपण, हत्तीसंग्रहालय आदि कामांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे वनौषधी उद्यान टाटा ट्रस्टमार्फत उभे राहात आहे. पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेले वनविभागाकडील ९३.९६७ हेक्टर क्षेत्र शासनाने वन विकास महामंडळास हस्तांतरित केले आहे. राखीव वनक्षेत्र या प्रकारात मोडणाºया क्षेत्रात मनोरंजन पार्कसह वनौषधी उद्यान साकारण्याची संकल्पना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी मांडली होती. त्यानुसार, राज यांनी सरकारकडे पाठपुरावा करत सदर वनक्षेत्रात वनौषधी उद्यान साकारण्याची परवानगी मिळविली. सदर प्रकल्प टाटा ट्रस्टमार्फत उभारण्यात येत असून, त्यात महापालिकेला कुठलीही आर्थिक झळ बसणार नाही. वनौषधी उद्यान उभारणीसंदर्भात टाटा ट्रस्ट व महापालिका यांच्यात पाच वर्षांकरिता सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून कामाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात वनोद्यानाच्या सभोवताली सुमारे ३६.५३ एकर क्षेत्रावर सोलर इलेक्ट्रिक फेन्सिंग उभारणीचे काम सुरू आहे.