वीर पत्नी विजेता बनणार ‘फ्लाइंग आॅफिसर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:42 AM2019-07-28T00:42:45+5:302019-07-28T00:43:21+5:30
पती शहीद झाल्याचे हिमालयाएवढे दु:ख काही क्षणांत बाजूला करीत त्यांचे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा निर्धार करणारी ती वीरांगना आयुष्याच्या रणसंग्रामातही ‘विजेता’ असल्याचे तिने दाखवून दिले आहे.
नाशिक : पती शहीद झाल्याचे हिमालयाएवढे दु:ख काही क्षणांत बाजूला करीत त्यांचे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा निर्धार करणारी ती वीरांगना आयुष्याच्या रणसंग्रामातही ‘विजेता’ असल्याचे तिने दाखवून दिले आहे. स्क्वॉड्रन लिडर निनाद मांडवगणे काश्मीरमध्ये शहीद झाल्याचे दु:ख बाजूला सारत त्यांच्या पत्नी विजेता निनाद मांडवगणे यांनीदेखील ‘फ्लाइंग आॅफिसर’ बनण्याच्या दिशेने झेप घेतली आहे. त्यासाठी त्या नुकत्याच हैदराबादला रवाना झाल्या असून, वर्षभराचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या जुलै २०२० मध्ये भारतीय हवाईदलात अधिकारी म्हणून रुजू होतील.
भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे पडघम वाजत असतानाच २७ फेब्रुवारीच्या काळरात्री निनाद मांडवगणे यांचे विमान बडगाम येथे कोसळले आणि संपूर्ण मांडवगणे कुटुंबीयांवर जणू आकाशच कोसळले. त्या दिवशी निनाद यांच्या पत्नी विजेता यांना बसलेला धक्का हा शब्दातीत होता. मात्र, आपणच कोसळलो तर आपली दोन वर्षांची चिमुरडी आणि निनादचे आई-वडील यांना कोण सांभाळेल, असा विचार करीत विजेता यांनी त्या धक्क्यातून सावरण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी मार्चमध्येच ‘सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड’ची परीक्षा दिली. त्यानंतर मार्चअखेरीस परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्याचा निकाल आला.
पात्रतेसाठीचा संघर्ष
विजेता या लेखीपरीक्षेत उत्तीर्ण झाल्या असल्या तरी वैद्यकीय चाचणी आणि तंदुरुस्तीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. दोन वर्षांच्या बालिकेची आई आणि गृहिणी असलेल्या विजेता यांना सैन्यदलाच्या क्षमतेची तंदुरुस्ती मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. मात्र, त्यातही न डगमगता त्यांनी दिवस-रात्र घाम गाळत शारीरिक तंदुरुस्तीच्या चाचणीतही बाजी मारली. अखेरीस कागदपत्रांची सर्व पूर्तता झाल्यानंतर विजेता या जुलै महिन्यातच प्रशिक्षणासाठी हैदराबादला रवाना झाल्या आहेत.
चिमुरडी वेदिता आजी-आजोबांकडे
निनाद आणि विजेता यांची चिमुरडी ‘वेदिता’ ही सध्या नाशिकला निनादचे आई-वडील श्रीमती सुषमा आणि अनिल मांडवगणे यांच्याच घरी राहत आहे. सतत आईजवळच बिलगून राहणाऱ्या वेदिताची आईदेखील प्रशिक्षणासाठी आता हैदराबादला गेल्यापासून सतत आई कुठे आहे? हाच ध्यास तिला लागला आहे. त्यामुळे मांडवगणे कुटुंबाला एकाच वेळी अनेक भावनिक आंदोलने झेलत त्या गोंडस बालिकेचे मन राखताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
परीक्षेवेळीच झाली होती भेट
विजेता या मूळच्या लखनऊच्या विजेता तिवारी होत्या. निनाद आणि विजेता यांची भेट भोपाळलाच ‘सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड’ची परीक्षा देतानाच झाली होती. त्या परीक्षेत निनाद उत्तीर्ण, तर विजेता या अनुत्तीर्ण झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर सुमारे चार वर्षे एकमेकांशी समाज माध्यमांद्वारे संवाद झाल्यानंतर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मग दोन्ही कुटुंबांनी त्यांचे लग्न लावून दिले. तेव्हापासून विजेता या निनादबरोबरच त्यांच्या बदलीच्या ठिकाणी मिळणाºया हवाईदलाच्या क्वार्टर्समध्ये राहत होत्या.
तेराव्याच्या दिवशीच परीक्षेला
सैन्यदलाची परीक्षा ही दर सहा महिन्यांनी होत असते, याची माहिती विजेता यांना होती. सैन्यदलातीलच एका परिचिताकडून ही परीक्षा निनादच्या तेराव्याच्या दिवशीच म्हणजेच ११ मार्चला असल्याचे विजेता यांना समजले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून आपण परीक्षेला बसणार असल्याचा निर्धार कळविला. त्यांच्यासाठी मग प्रवेशाचा अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि विजेता या ‘फ्लाइंग आॅफिसर’ पदाच्या परीक्षेसाठी गुजरातमधील गांधीनगरला पोहोचल्या. निनादच्या तेराव्याच्या दिवशी विजेता यांनी परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देत एकप्रकारे निनाद यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली.