अहो, ऐकलत का? नाशिक महापालिकेने डस्टबिन घेतल्या फक्त स्वच्छ सर्वेक्षणाच्या एक दिवसाच्या परीक्षेपुरता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:50 PM2017-12-14T14:50:19+5:302017-12-14T14:52:25+5:30
आरोग्याधिका-याचे अजब स्पष्टीकरण : ..ही तर शासनाची फसवणूक असल्याचा शिवसेनेचा आरोप
नाशिक - महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी प्रत्येकी दोन नगासाठी ११ हजार १२१ रुपये खर्चून डस्टबिन खरेदी केल्या असताना, शिवसेनेने बाजारातून त्यापेक्षाही उच्च दर्जाच्या डस्टबिन अवघ्या २३०४ रुपयांत खरेदी करत त्या अतिरिक्त आयुक्तांसह आरोग्याधिका-यांना भेट देऊन डस्टबिन घोटाळ्याच्या सखोल चौकशीची मागणी केली. मात्र, सदर डस्टबिन या जानेवारी महिन्यात स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत होणा-या एका दिवसाच्या परीक्षेपुरताच बसविण्यात आल्या असून परीक्षा आटोपल्यावर दुस-या दिवशी त्या शाळा-वसतिगृहांमध्ये बसविण्यात येणार असल्याचे अजब आणि हास्यास्पद स्पष्टीकरण आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिले. त्यामुळे, महापालिका स्वच्छ भारत अभियानाचे पुरस्कर्ते पंतप्रधान मोदींसह शासनाचीही फसवणूक करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने ओला आणि सुका कचरा विलगीकरणासाठी काय उपाययोजना केल्या यासाठी २२ गुण आहेत. सदर गुणप्राप्तीसाठी महापालिकेने शहरातील व्यापारीपेठांमध्ये १८९ ठिकाणी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डस्टबिन बसविल्या आहेत. सदर प्रत्येकी दोन नग ५५ लिटर्स क्षमतेच्या डस्टबिनची खरेदी सर्वात कमी दर देणा-या नाशिकच्याच रोटोमॅटिक कंटेनर्स या कंपनीकडून करण्यात आली असून त्यासाठी चक्क ११ हजार १२१ रुपये दर मोजण्यात आला आहे. या डस्टबिन खरेदीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शिवसेनेने गुरुवारी (दि.१४) बाजारातून उच्च दर्जाच्या ८० लिटर्स क्षमतेच्या हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन डस्टबिन जीएसटीसह अवघ्या २३०४ रुपयांमध्ये खरेदी करुन आणत त्या अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे आणि आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांना भेट दिल्या आणि या प्रकाराची सखोल चौकशी झाली नाही तर येणारी महासभाच होऊ न देण्याचा इशारा दिला. विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते आणि शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन डस्टबिन खरेदीप्रकरणी जाब विचारला. यावेळी, खुलासा करताना आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी सांगितले, स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत जानेवारीत परीक्षा होणार असून २२ गुण मिळविण्यासाठी ह्या डस्टबिन बसविलेल्या आहेत. एक दिवसाची परीक्षा झाल्यानंतर त्या दुस-या दिवशी काढून घेत शाळा, महिला वसतिगृह यांना दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १८९ डस्टबिन खरेदी करण्यात आल्या असून एकूण ६०० डस्टबिन खरेदी करण्यात येणार असल्याचेही अजब उत्तर आरोग्याधिका-यांनी दिले. आरोग्याधिका-यांच्या या अजब उत्तराने शिवसेनेच्या पदाधिका-यांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि डस्टबिन घोटाळ्याबरोबरच केवळ परीक्षेपुरता डस्टबिन लावून आपण पंतप्रधान मोदी आणि शासनाची फसवणूक करत असल्याचा आरोप केला.