जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी होणार हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:15 AM2018-10-02T00:15:33+5:302018-10-02T00:15:43+5:30
नाशिक : केंद्र सरकारच्या भारत नेट प्रोजेक्ट अंतर्गत ग्रामीण भागातील ७५ तर शहरातील पंधरा अशी सुमारे ९० पोलीस ठाणी व अन्य कार्यालये आता हायटेक होणार आहेत. केंद्र सरकारच्या विशेष योजनेंतर्गत सर्व पोलीस ठाणी फायबर आॅप्टिक केबल आणि इंटरनेटवर जोडण्यात येणार असून, त्यामुळे नागरिकांना आॅनलाइन तक्रार नोंदवण्यापासून तर पोलिसांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगसह अन्य अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
संजय पाठक ।

इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशनमधील क्रांतीमुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, त्याचा शासकीय कामकाजात अनुकूल परिणाम जाणवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व पोलीस ठाणी तसेच शहरातीलही पोलीस ठाणी आणि महत्त्वाची कार्यालये केंद्र सरकारच्या भारत नेट प्रोजेक्ट अंतर्गत इंटरनेटच्या कनेक्टिव्हीटीने जोडण्यात येणार असून, त्या अंतर्गत शंभर केबीपीएसचा स्पीड पोलीस खात्याला मिळेल. भारत दूरसंचार निगमच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांमध्ये आॅनलाइन एफआयआर आणि गुन्हेगार तसेच अन्य माहितीचे डाटा शेअरिंग शक्य होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना पोलीस ठाण्यात चांगली वागणूक मिळत नाही किंवा काही वेळा पोलीस ठाण्यावर नागरिक चालून येण्याचे प्रसंग घडतात त्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसविण्यात येणार आहेत. तसेच पोलीस मुख्यालयातून पोलीस ठाण्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधणेदेखील शक्य होणार आहे.पोलीस ठाणे आॅप्टिकल फायबरने जोडण्यासंदर्भात ग्रामीण आणि शहर पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावावर काम सुरू आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सक्षम आणि गतिमान होण्यास मदत तर मिळेलच शिवाय गुन्हेगारी रोखण्यासाठीदेखील या तंत्रज्ञानाची पोलीस खात्याला मदतच होणार आहे.
- नितीन महाजन, वरिष्ठ महाप्रबंधक, बीएसएनएल, नाशिक