मकरसंक्रांतीचे वाणही झाले हायटेक
By admin | Published: February 1, 2016 11:08 PM2016-02-01T23:08:10+5:302016-02-01T23:23:17+5:30
अॅक्सेसेरिजची लूट : पारंपरिकतेला आधुनिकतेची झालर
नाशिक : प्लास्टिकचे डबे, गाळणी, चमचे यांची जागा आता हेडफोन, मोबाइल कव्हर, मोबाइल स्टॅँड, मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह, पॉवरबॅँक, चित्रपट, गाण्यांच्या सीडीज, डीव्हीडीज आदि हायटेक अॅक्सेसेरिजने घेतली असून आधुनिक जगतातील आधुनिक नारी आता संक्रांतीचे वाण लुटताना हायटेक झाल्याचे दिसून येत आहे.
अॅक्सेसेरिजबरोबरच मॉड्यूलर किचनला शोभतील आणि गृहिणींचे काम सोपे करतील अशा वस्तूंचाही यंदा वाणात समावेश आहे. त्यात फ्रीजसेफ कंटेनर्स, मायक्रोवेव्ह सेफ प्लॅस्टिकचे बाउल, मायक्रोवेव्ह सेफ मग, पेटजार्स, स्लायसर, रोटी प्लेट, फ्रुट कटर, लसूण सोलणी आदिंचा समावेश असून बऱ्याच महिला मैत्रिणींची गरज ओळखून व वाण डबल होणार नाही याची काळजी घेत नवनवीन प्रकारांचा शोध आहे. वाणातले हायटेक आयटम घाऊक प्रमाणात खरेदी करण्यासाठी होलसेल मार्केटची मदत घेतली जात असून काही महिलांनी तर आॅनलाइन आॅर्डर देऊन वस्तू मागविण्यावरही भर दिलेला दिसून येत आहे. यंदा महिलांचा वैविध्यपूर्ण वस्तूंची भेट देण्यावर भर दिसून येत आहे.
यंदा हळदीकुंकवाच्या गोल, चौकोनी, षटकोनी, त्रिकोणी, कलश आकारातील, मयूर आकारातील कुयऱ्यांना मोठी मागणी आहे. या कुयऱ्यांना हळदी-कुंकू एकत्र होणार नाही असे भक्कम कप्पे असून अक्षदा, हलवा ठेवण्याचीही त्यात सोय आहे.
या कुयऱ्यांना वरच्या बाजूने मणी चिटकवलेले असल्याने त्याचा लूकही आकर्षक झालेला दिसून येत आहे. याशिवाय या कुयऱ्यांचे दरही किफायतशीर असल्याने महिला त्यांना पसंती देत आहेत. साधारणत: १२० ते १४० रुपये डझन या दराने या कुयऱ्या मिळत असून त्यात रंगांचेही वैविध्य असल्याने निवड करणे सोपे जात आहे. पारंपरिक वस्तूंची चलती- चमचा, पळ्या, उचटणे, काचेचे, स्टील व प्लास्टिकचे बाउल सेट, वाट्या, डिश, स्टीलच्या किसण्या, रोटी प्लेट, भाज्या, फुलांसाठीच्या प्लास्टिकच्या परड्या, देवघरात उपयोगी अशा नक्षीदार प्लास्टिक प्लेट, चहाच्या गाळण्या, पावशेर, आतपावच्या मापात साखर, चहा पावडर, केशतेलाच्या बाटल्या, लिपगार्ड, व्हॅसलीन, मॉईश्चरायझर्स, कोल्डक्रीम बॉटल, शॅम्पू सॅशे, टाल्कम पावडर, टिकल्या, साडीपिना, पोथ्या, हातरुमाल, हॅँडबॅग, मनीपर्स या वस्तूही बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)