महापालिकेच्या वृक्षतोडीला उच्च न्यायालयाची स्थगिती
By admin | Published: April 8, 2017 12:42 AM2017-04-08T00:42:24+5:302017-04-08T01:05:48+5:30
नाशिक : महापालिकेने गंगापूररोड, दिंडोरीरोड, पेठरोड याठिकाणी सुरू केलेल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली
नाशिक : महापालिकेने गंगापूररोड, दिंडोरीरोड, पेठरोड याठिकाणी सुरू केलेल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, महापालिकेने आतापर्यंत केलेल्या वृक्षलागवडीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेने उच्च न्यायालयाच्याच निर्देशानुसार, गंगापूररोड, दिंडोरीरोड, पेठरोड आदि भागांत रस्त्यांत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची तोड करण्यास प्रारंभ केला होता. परंतु, महापालिकेकडून रस्त्यांत अडथळा न ठरणारेही वृक्ष तोडले जात असल्याची तक्रार पर्यावरणवाद्यांनी आयुक्तांची भेट घेऊन केली होती. महापालिकेने सुमारे ३७५ वृक्षांपैकी आतापावेतो सुमारे दोनशे वृक्षांची तोड करत रस्ते मोकळे केले आहेत. महापालिकेच्या या मोहिमेचे एकीकडे परिसरातील स्थानिक रहिवाशांकडून स्वागत होत असताना पर्यावरणवाद्यांनी मात्र महापालिकेच्या या वृक्षतोड मोहिमेस हरकत घेतली. त्याविरुद्ध पर्यावरणप्रेमी ऋषिकेश नाझरे आणि मानव उत्थान मंचने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने महापालिकेच्या वृक्षतोडीला स्थगिती दिली असून, न्यायालयाला सद्यस्थितीतील वृक्षलागवडीसंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने आतापर्यंत किती वृक्षलागवड केली, किती वृक्षांचे पुनर्रोपण केले आणि कोणत्या प्रकारच्या, जातीच्या वृक्षांची तोड केली याची सारी माहितीही न्यायालयाने मागविली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर महापालिकेने वृक्षतोड थांबविली आहे.