उच्च न्यायालयाने मागविली बंदोबस्ताची माहिती
By admin | Published: September 9, 2015 11:48 PM2015-09-09T23:48:26+5:302015-09-09T23:48:42+5:30
जनहित याचिका : आज पुन्हा होणार सुनावणी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या शाही पर्वणीनिमित्त पोलिसी अतिरेकी बंदोबस्ताविरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर बुधवारी सुनावणी होऊन न्यायालयाने सरकारपक्षाकडे पोलीस बंदोबस्तासह नियोजनाची माहिती मागविली असल्याचे अपक्ष गटनेते व मनपा शिक्षण सभापती संजय चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा याचिकेवर सुनावणी होणार आहे.
पहिल्या पर्वणीच्या वेळी पोलीस अतिरेकी बंदोबस्ताचा भाविकांसह स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. न्यायालयाने सदर याचिका दाखल करून घेताना बुधवारी सुनावणी घेतली. यावेळी न्यायालयाने सरकारपक्षाकडे घाट आणि स्मशानभूमींचे अंतर, आपत्कालिन स्थितीसाठी असलेल्या प्रशासकीय मार्गावर नागरिकांना पायी फिरण्यासही केलेली मनाई यांसह पोलीस बंदोबस्ताची माहिती मागविल्याचे संजय चव्हाण यांनी सांगितले. याचिकाकर्त्याचे वकील विवेक साळुंके यांनीही पोलिसांनी काढलेल्या अध्यादेशांना शासनाची मान्यताच घेतली नसल्याचेही निदर्शनास आणून दिले.
आता गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा सुनावणी होणार असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)
नागरिकांच्या त्रासाबद्दल याचिका
गोदाघाटाकडे स्नानासाठी येण्यासाठी सुमारे १५ ते २० किलोमीटर पायपीट करावी लागली होती, शिवाय ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावत भाविकांना अडथळे निर्माण केले होते. गोदाघाटालगतच्या अमरधाममध्ये अंत्यविधीलाही मनाई करण्यात आली होती. व्यावसायिकांना व्यवसायाची पर्वणी असताना त्यांनाही व्यवहार बंद ठेवणे भाग पाडण्यात आले होते. या साऱ्या प्रकाराबद्दल सामाजिक कार्यकर्ते दीपक लवटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.