हायप्रोफाइल हुक्का पार्टी पोलिसांनी उधळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:29+5:302021-03-29T04:09:29+5:30

गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरजवळील विविध गावांमध्ये अलीकडे ‘नाइट पार्टीकल्चर’च्या नावाखाली मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये अमलीपदार्थांचे सेवन करत उच्चभ्रूंचा ...

The high-profile hookah party was foiled by police | हायप्रोफाइल हुक्का पार्टी पोलिसांनी उधळली

हायप्रोफाइल हुक्का पार्टी पोलिसांनी उधळली

googlenewsNext

गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरजवळील विविध गावांमध्ये अलीकडे ‘नाइट पार्टीकल्चर’च्या नावाखाली मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये अमलीपदार्थांचे सेवन करत उच्चभ्रूंचा धिंगाणा सुरू राहत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या पार्टीकल्चरमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाला हातभार लागण्यास मदत होत असल्याचेही बोलले जात आहे. सरकारी यंत्रणेने याकडे वेळीच लक्ष पुरवून कारवाईची मागणी होत होती. शनिवारी अशाचप्रकारे सावरगावात रंगलेल्या हुक्का पार्टीची ‘दुर्गंधी’ थेट ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यापर्यंत येऊन पोहोचली. पाटील यांनी स्वत: तत्काळ आपल्या विशेष पथकासह स्थानिक गुन्हे शाखा, तालुका पोलिसांना ‘कॉल’ देत सावरगावमधील ‘इलाका’ नावाचे रेस्टॉरंट व फार्महाऊसवर रात्री ११ वाजेच्या सुमारास छापा मारला. हॉटेल व फार्महाऊस मालक गौरव मधुकर मौले यांच्यासह तेथील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचाही संशयित आरोपींमध्ये सहभाग आहे. तंबाखूजन्य पदार्थांचा साठा व हुक्का पिण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. सुमारे २ लाखाांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

---इन्फो--

सर्रासपणे नियमांचा भंग अन‌् शासकीय कामात अडथळा

फार्महाऊसमध्ये हुक्क्यासारख्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना आढळून आलेल्या १७ संशयितांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व कोरोना निर्बंधांचा भंग केल्याप्रकरणी ४२ लोकांविरुद्ध कलम-१८८नुसार कारवाई करण्यात आली आहे. एका संशयिताने वाहनात लपून पोलिसांच्या कारवाईतून निसटून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही पोलिसांनी त्याचा पाठलाग करत अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने वाहन थांबविले नसल्याने त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---इन्फो---

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष

सोशल मीडियावर गंगापूर धरण परिसराला लागून असलेल्या विविध गावांमध्ये रात्रीच्या ‘पार्टीकल्चर’मुळे स्थानिक नागरिकांची झोप उडत असल्याची बाब पुढे आल्यानंतर ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त सोमवारी (दि.२२) रोजी प्रसिद्ध केले होते. पार्टीकल्चरच्या नावाखाली सर्रासपणे सर्व नियम, कायदे हायप्रोफाइल मंडळींकडून पायदळी तुडविले जात असल्याचे या वृत्तातून अधोरेखित करण्यात आले होते. यानंतर ग्रामीण पोलिसांनीसुध्दा याबाबत दखल घेत अशाप्रकारच्या हायप्रोफाइल पार्ट्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: The high-profile hookah party was foiled by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.