ज्येष्ठांनो थंडीत हृदयाला जपा; हृदयविकार, लकव्याचा मोठा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 04:04 PM2021-12-28T16:04:48+5:302021-12-28T16:10:36+5:30
नाशिक - थंडीचा कडाका वाढल्यामुळे हृदय आणि शरीरातील रक्त प्रवाहावर परिणाम होऊन आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. थंडीमुळे हृदयाच्या ...
नाशिक - थंडीचा कडाका वाढल्यामुळे हृदय आणि शरीरातील रक्त प्रवाहावर परिणाम होऊन आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. थंडीमुळे हृदयाच्या नसा आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनपुरवठा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे ज्येष्ठांसह विविध विकार असलेल्या व्यक्तींना हृदयविकार आणि लकव्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हिवाळ्यात थंडीमुळे हृदयरोगाने त्रस्त असलेल्या लोकांमध्ये हार्ट रेट वाढण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे दैनंदिन जीवनात काळजी घेण्याची गरज असते. वयोवृद्ध नागरिकांच्या हृदयाचे ठोके सामान्य माणसांच्या तुलनेमध्ये वाढतात किंवा कमी होतात. चक्कर येणे, डोके दुखणे, छातीमध्ये वेदना होणे, जबड्याला वेदना होणे, डोळ्यांना धूसर दिसणे यासारख्या समस्या उद्भवत असतील, तर मात्र वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
गरम कपडे वापरा
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो. तसेच त्यांना ब्रेन हॅमरेजही होऊ शकते. थंडीमध्ये गरम कपडे परिधान करण्याला प्राधान्य द्यायला हवे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच आरोग्याची नियमित तपासणी करावी.
का असतो हृदयविकाराचा धोका
थंडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी होते आणि त्यामुळे रक्तवाहिन्या गोठतात. यामुळेच हृदयरोगाने त्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराची समस्या वाढते. ही समस्या टाळण्यासाठी शक्य असेल, तेवढा व्यायाम करा. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
आरोग्याकडेही द्या लक्ष
हृदयरोगाने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी बदाम आणि पिस्त्याचे सेवन करणे फायदेशीर असते. तसेच थंडीच्या दिवसांत सकाळच्या उन्हात काही वेळ घालवावा. शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी फळांचे सेवन करावे. नियमितपणे व्यायाम आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
थंडीच्या दिवसांत पाणी कमी प्रमाणात प्यायले जाते. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास रक्त घट्ट होण्याचा धोका संभवतो. थंडीमुळे हृदयाचे ठोकेदेखील वाढतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांना हा धोका अधिक असतो.
त्यामुळे संतुलित आहाराबरोबरच भरपूर पाणी प्यायला हवा. तसेच नियमित व्यायाम आणि उबदार कपड्यांचा वापर करावा.
- डॉ. राहुल कैचे, हृदयरोगतज्ज्ञ