उच्चदाब वाहिनी पडून विद्यार्थिनीचा मृत्यू
By admin | Published: March 2, 2016 11:24 PM2016-03-02T23:24:37+5:302016-03-02T23:25:35+5:30
उभाडे शिवारात तणाव : मृतदेह न उचलण्याची ग्रामस्थांची भूमिका
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील उभाडे शिवारात वीज वितरण कंपनीची उच्चदाब वाहिनी अंगावर पडल्याने विद्यार्थिनीचा भाजून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली. याबाबात पिंपळगाव मोर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
वीज वितरण कंपनीचा ढिसाळ कारभार या घटनेस कारणीभूत असून, कारणीभूत ठरलेल्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याखेरीज सदर विद्यार्थिनीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका तिच्या नातलगांनी व ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घोटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळगाव मोर येथे बुधवारी दुपारी ३ वाजता उभाडे शिवारात शेतामध्ये उच्चदाब वाहिनी लोंबकळलेल्या अवस्थेत होती. तिच्या दुरुस्तीची मागणी गावकऱ्यांनी अनेकवेळा करूनही वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बुधवारी येथील गायत्री भाऊराव काळे (१५) या सहावीत शिकणाऱ्या मुलीच्या अंगावर ती वाहिनी तुटून पडल्याने गायत्री शंभर टक्के भाजली. तिला नाशिक येथे जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
घोटी येथील विद्युत उपकेंद्रालगत उच्चदाब वाहिनी काही दिवसांपासून लोंबकळलेल्या अवस्थेत असल्याचे ग्रामस्थानी वारंवार सांगून याबाबीकडे उपकेंद्राने लक्ष दिले नसल्याची
तक्र ार केली जात आहे.
या घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केले जात असून, वीज मंडळाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत पिंपळगाव मोर येथे या घटनेबाबत ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेतली होती. घोटी पोलिसात याबाबत अकस्मात नोंद करण्यात आली आहे.(वार्ताहर)