अधिकमास समाप्तीनिमित्त भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:04 AM2018-06-12T01:04:52+5:302018-06-12T01:04:52+5:30
दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणाऱ्या अधिकमास अर्थात धोंड्याच्या महिन्याची बुधवारी (दि.१३) समाप्ती होत असून, त्यामुळे अखेरचा पर्व साधण्यासाठी गोदावरी घाट, कुशावर्त तीर्थ आदी ठिकाणी तीर्थस्नान, देवदर्शनासाठी गर्दी पहायला मिळत आहे. पाण्याचे आवर्तन सोडल्याने सध्या गंगेला भरपूर पाणी असून, भाविक रामकुंडासह विविध ठिकाणी गंगास्नानाचा आनंद घेत आहे.
नाशिक : दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणाऱ्या अधिकमास अर्थात धोंड्याच्या महिन्याची बुधवारी (दि.१३) समाप्ती होत असून, त्यामुळे अखेरचा पर्व साधण्यासाठी गोदावरी घाट, कुशावर्त तीर्थ आदी ठिकाणी तीर्थस्नान, देवदर्शनासाठी गर्दी पहायला मिळत आहे. पाण्याचे आवर्तन सोडल्याने सध्या गंगेला भरपूर पाणी असून, भाविक रामकुंडासह विविध ठिकाणी गंगास्नानाचा आनंद घेत आहे. स्नानानंतर गंगेला दिवा अर्पण करणे, देवदर्शन करणे, देवाला अधिकाचे वाण देणे आदींवर भर दिला जात आहे. भाचा, लेक-जावई यांना अधिकाचे दान दिल्यानंतर आता लेकी-सुनांची मातृपूजनासाठी लगबग पहायला मिळते आहे. आपल्या आईला अधिकाचे वाण देणे, तिची भेटवस्तू देऊन पूजा केली जात आहे. आईच्या पाद्यपूजनाला या काळात महत्त्व असते. त्यामुळे आपल्या लाडक्या आईसाठी साडी, इतर वस्तू खरेदी करण्यासाठी लेकी-सुनांची लगबग पहायला मिळत आहे. अधिकाचा अखेरचा पर्व साधण्यासाठी भाविकांची लगबग असून, अनारसे, बत्तासे, आंबे, कपडे, सोने चांदी, तांबे आदींच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. पाऊस सुरू होण्याआधी अधिकाचे निमित्त करीत मांडे-आंबारस जेवणाचीही मेजवानी साधली जात आहे. बुधवारपासून (दि.१६ मे) अधिकमास सुरू झाला होता. बुधवारी (दि.१३) अमावास्या असल्यानेही शहरातील राज्यभरातून भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच एसटी महामंडळाचा संप मिटल्याने, बससेवा सुरळीत सुरू झाल्याने आणि शाळा सुरू होण्यास दोन दिवस बाकी असल्याने भाविकांनी ‘अधिक’ साधण्यासाठी तीर्थस्थळांकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही नियोजन केले आहे.