कृत्रिम बुद्धिमत्तेचा अति वापर भविष्यात सर्वांना हानिकारक : संजय ढोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 06:20 PM2018-08-26T18:20:10+5:302018-08-26T18:20:57+5:30
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्याने माणसाची स्वत: विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे व ते भविष्यात सर्वांसाठी हानिकारक ठरणार असल्याचे मत पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक व संशोधक डॉ. संजय ढोले यांनी व्यक्त केले.
चांदवड : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्याने माणसाची स्वत: विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे व ते भविष्यात सर्वांसाठी हानिकारक ठरणार असल्याचे मत पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक व संशोधक डॉ. संजय ढोले यांनी व्यक्त केले. येथील श्री. नेमिनाथ जैन संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदवड येथे विज्ञान मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. संजय ढोले यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दत्ता शिंपी होते.
डॉ. ढोले यांनी विज्ञानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, पुणे विद्यापीठाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी स्वयंचलित वैज्ञानिक जनजागृती अभियान राबविले आहे. यामध्ये विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थी ग्रामीण आदिवासी भागातील शाळांपर्यंत पोहोचतात व विद्यार्थ्यांसमोर विविध प्रयोग सादर करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवितात. त्याचबरोबर सापेक्षता वाद, कृष्ण विवरे, हिग्ज बोसॉन, सॉयो नवग्रह या विविध गोष्टींची त्यांनी माहिती दिली. विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनिल गिते यांनी डॉ. संजय ढोले यांचा परिचय करून दिला. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रा. मयूर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वप्निल वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य संजय खैरनार, डॉ .अरविंद पाटील, डॉ.तुषार साळवे, प्रा. चैतन्य कुंभार्डे, प्रा. मधुकर झांजे, डॉ. सुदीन दळवे व विज्ञान विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.