प्रभाग १४ मध्ये सर्वाधिक इव्हीएम
By admin | Published: February 12, 2017 10:55 PM2017-02-12T22:55:21+5:302017-02-12T22:55:37+5:30
मतदानाची तयारी : आठ ठिकाणी प्रत्येकी दोन मशीन
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी दि. २१ फेबु्रवारीला होणाऱ्या मतदानाची तयारी प्रशासनाने चालविली असून, ४५७८ इव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तयार ठेवले आहेत. पूर्व विभागातील प्रभाग १४ मध्ये सर्वाधिक ४० उमेदवार असल्याने याठिकाणी ५४ मतदान केंद्रांवर सर्वाधिक २३८ इव्हीएम उपलब्ध करून दिले जाणार आहेत, तर आठ ठिकाणी प्रत्येकी दोन मशीनवरच मतदारांना बटण दाबावे लागणार आहे.
महापालिका निवडणुकीत १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार रिंगणात आहेत. ३१ प्रभागांमध्ये एकूण १४३३ मतदान केंद्र असणार आहेत. त्यासाठी निवडणूक शाखेने ४५७८ इव्हीएम अर्थात बॅलेट युनिट मागविले असून, १५४९ सी.यू. तयार ठेवले आहेत. २९ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार तर दोन प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन उमेदवार निवडून द्यायचे आहेत. एका इव्हीएमवर १५ उमेदवारांची नावे बसू शकतात तर एक ‘नोटा’साठी बटण असते. ज्या प्रभागात उमेदवारांची संख्या कमी असेल तेथे एका मशीनवर दोन गटातील उमेदवारांची मतपत्रिका बसविली जाणार आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये अ गटात ९, ब गटात ५ तर क आणि ड गटात प्रत्येकी १३ उमेदवार आहेत. त्यामुळे याठिकाणी एकूण ५४ मतदान केंद्रांवर प्रत्येकी चार बॅलेट युनिट उपलब्ध करून दिले जाणार असून, यंत्रणेत काही बिघाड झाल्यास दहा टक्के राखीव म्हणून एकूण २३८ बॅलेट युनिट तर ५९ सी.यू. उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय, प्रभाग क्रमांक १०, ११, १६, १७, २१ आणि २९ या ठिकाणी प्रत्येकी चार इव्हीएम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ८, ९, १३, १८, १९, २२, २३, २५, २६, २७, ३० आणि ३१ या ठिकाणी प्रत्येकी तीन इव्हीएम असतील. प्रभाग क्रमांक ५, ६, ७, १२, १५, २०, २४ आणि २८ या प्रभागांमध्ये मतदारांना केवळ दोनच मशीनवर चार गटांसाठी चार वेळा बटण दाबावे लागणार आहे. प्रभाग १३ मध्ये सर्वाधिक ६१ मतदान केंद्र असणार आहेत, तर प्रभाग १० मध्ये सर्वांत कमी ३१ मतदान केंद्र असतील. (प्रतिनिधी)