जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:41 AM2018-12-18T00:41:28+5:302018-12-18T00:41:49+5:30
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रसूतीची सर्वाधिक संख्या ही नाशिक जिल्हा रुग्णालयाची ठरली आहे़
नाशिक : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रसूतीची सर्वाधिक संख्या ही नाशिक जिल्हा रुग्णालयाची ठरली आहे़ गत वर्षभरात जिल्हा रुग्णालयात ६ हजार २९६ महिलांची प्रसूती करण्यात आली असून, यामध्ये २ हजार ४२९ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे़ केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील महिलाही प्रसूतीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयास प्राधान्य देत आहेत़ राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक प्रसूतीची नोंद असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्स डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली आहे़ दिवसेंदिवस आरोग्याच्या सुविधा महाग होत चालल्या असून, त्यावरील खर्च हा गरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे़ खासगी दवाखान्यात प्रसूती, उपचार वा प्रसंगी सिझेरियन करावे लागल्यास हजारो रुपये खर्च येतो़ मात्र, याच सोयीसुविधा जिल्हा रुग्णालयातही मिळत असल्याने महिलांकडून प्राधान्य दिले जाते़ केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महापालिका हद्दीसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील महिलाही जिल्हा रुग्णालयात येतात़ जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्स व कर्मचारी यामुळे नॉर्मल प्रसूती होण्याचे प्रमाण अधिक आहे़ प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस वेळीच सुविधा न मिळाल्यास आई व बाळ अशा दोघांच्याही जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता असते़ नाशिक जिल्हा रुग्णालयात डिसेंबर २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत तीन हजार ८६७ नॉर्मल प्रसूती तर दोन हजार ४२९ महिलांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली आहे़
गरोदर मातांना आधार
केवळ नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे, तर पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातूनही गर्भवती महिला मोठ्या संख्येने येतात़ रुग्णालयात नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण ९० टक्के, तर सिझेरियनचे प्रमाण अवघे १० टक्के आहे़ जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित स्टाफमुळे या ठिकाणी सुरक्षित प्रसूती केली जाते़ सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक प्रसूती झाल्या आहेत़ - डॉ़ सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक