गणनेत पंचवटी, सिडकोत सर्वाधिक वृक्षसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:22 AM2018-06-01T01:22:32+5:302018-06-01T01:22:32+5:30
नाशिक : महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत ४७ लाख ९५ हजार वृक्षसंपदा आढळून आली असून, पंचवटी व सिडको विभागांत सर्वाधिक वृक्षसंख्या असल्याचे समोर आले आहे.
नाशिक : महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत ४७ लाख ९५ हजार वृक्षसंपदा आढळून आली असून, पंचवटी व सिडको विभागांत सर्वाधिक वृक्षसंख्या असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी महापालिका, सामाजिक वनीकरण विभाग तसेच वनखात्याकडून मोठ्या संख्येने वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जात असताना, सरकारी जागांवर २७ लाख १० हजार वृक्षसंख्या आढळून आली आहे, तर खासगी व इतर जागेवर नागरिकांच्या सहभागातून २० लाख ८४ हजार वृक्ष आढळून आले आहेत.
महापालिकेमार्फत न्यायालयाच्या निर्देशानुसार वृक्षगणनेची प्रक्रिया एका खासगी एजन्सीमार्फत राबविली जात आहे. आतापर्यंत शहरात ४७ लाख ९५ हजार ३८७ वृक्ष आढळून आले आहेत. अद्याप आर्टिलरी सेंटर व महाराष्टÑ पोलीस अकादमी या भागातील वृक्षगणनेचे काम शिल्लक आहे.
वृक्षगणनेत सर्वाधिक १७ लाख ५२ हजार १७७ वृक्षसंख्या ही एकट्या पंचवटी विभागात आढळून आली आहे. त्यामुळे पंचवटी खऱ्या अर्थाने आजच्या युगातही दंडकारण्याचा भाग असल्याचे समोर आले आहे. त्याखालोखाल सिडको विभागात १५ लाख ८५ हजार ६१८ वृक्षसंख्या आढळून आली आहे. नाशिक पश्चिम व नाशिक पूर्वविभाग हा दाट लोकवस्तीचा असल्याने याठिकाणी वृक्षांचे प्रमाण दीड टक्क्यापेक्षाही कमी आहे.
दरम्यान, महापालिका, सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. त्यावर कोट्यवधीचा खर्च होतो. याशिवाय, गेल्या तीन वर्षांपासून राज्य शासनाच्या वन विभागामार्फत वृक्षलागवडीचा जम्बो कार्यक्रम राबविण्यात येत आहे. असे असतानाही सरकारी जागेतील वृक्षसंख्या २७ लाख १० हजारांच्या आसपास आढळून आलेली आहे, तर खासगी व इतर जागेत नागरिक सहभागातून लागवड केलेली २० लाख ८४ हजार वृक्षसंख्या निदर्शनास आलेली आहे. त्यामुळे, सरकारी वृक्षलागवडीवर एकूणच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.