महामार्ग उड्डाणपूल : बोगद्यासाठी अजून किती बळी घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 08:41 PM2018-08-30T20:41:08+5:302018-08-30T20:44:18+5:30
राजीवनगरमधून बाजार करुन सिडकोमधील सुंदरबन कॉलनीकडे जात असताना एका कुटुंबाला बुधवारी संध्याकाळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले. या घटनेने अवघे शहर हळहळले
नाशिक : मागील तीन वर्षांपासून कमोदनगरजवळ उड्डाणपूलाला बोगदा करण्याची मागणी केली जात असताना याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील क्र ॉसिंग पॉइंट ओलांडताना आतापर्यंत २५हून अधिक लोकांचा बळी गेला. महामार्ग प्राधिकरणाला बोगदा तयार करण्यासाठी अजून किती बळी हवेत? असा संतप्त सवाल उपस्थित करत खासदार हेमंत गोडसे यांना जाब विचारला. गुरूवारी (दि.३०) दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमारे दोनशेहून अधिक महिलांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करत प्राधिकरणाचा निषेध नोंदविला.
राजीवनगरमधून बाजार करुन सिडकोमधील सुंदरबन कॉलनीकडे जात असताना एका कुटुंबाला बुधवारी संध्याकाळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले. या घटनेने अवघे शहर हळहळले असताना गुरूवारी कमोदनगरचे रहिवाशी रस्त्यावर उतरले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी करावी आणि बोगद्याच्या कामाचा नारळ वाढवावा, अन्यथा महामार्ग रोखण्याचा पवित्रा संतप्त झालेल्या महिलांनी घेतला होता. प्रशासनाच्या निषेधार्थ संतप्त महिलांनी घोषणाबाजी सुरू केली. याबाबत गोडसे यांच्याशी संपर्क साधण्यात आला; काही मिनिटांतच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जमलेल्या महिलांनी त्यांना घेराव घालत तीन वर्षांपासून बोगद्याचे काम का रखडले? या मुख्य प्रश्नासह विविध मागण्यांचा भडीमार केला.
यावेळी गोडसे यांनी संतप्त रहिवाशांची समजूत काढत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांशी तत्काळ संपर्क साधला. रहिवाशांसमक्ष त्यांनी संवाद साधत अधिका-यांना शुक्रवारी पाचारण करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, संतप्त महिलांनी त्यांना होणारा त्रास कथन करताना विविध समस्यांचा पाढा वाचला. बोगद्याच्या कामाबाबत शुक्रवारी हालचाल न झाल्यास महामार्ग रोखून धरणार असल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी संतप्त महिलांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध नोंदविला.