मराठा आंदोलनाने हायवे जाम
By admin | Published: February 1, 2017 01:17 AM2017-02-01T01:17:19+5:302017-02-01T01:17:37+5:30
चक्का जाम : शहराच्या विविध भागांत काहीकाळ वाहतूक विस्कळीत
नाशिक : सकल मराठा समाजातर्फे सरकारकडे केलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आडगावनाका येथे मुंबई-आग्रा महामार्गावर ठिय्या मांडून वाहतूक अडविली. त्याचप्रमाणे नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाटा, सातपूर परिसरात नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्ग, सिडकोमध्ये त्रिमूर्ती चौक, विल्होळी आदि ठिकाणी आंदोलन केले.
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाज संघटित होऊन रस्त्यावर उतरला असून, राज्यभरात शांतापूर्ण मार्गाने मराठा क्रांती मूक मोर्चे काढल्यानंतर या समाजाने मंगळवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याचाच भाग म्हणून आडगाव नाका येथे मुंबई - आग्रा महामार्गावर मराठा समाजाने रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून चक्का जाम आंदोलन केले. आंदोलकांमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांबरोबरच युवक, युवती, महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. वारकरी सांप्रदायातील मराठा समाजाच्या ज्येष्ठ मंडळींनी टाळमृदुंगाच्या तालात भजन करीत रस्ता अडविला, तर तरुणाईने ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा, लाख मराठा‘ अशा घोषणा दिल्या. यावेळी कोपर्डी हत्त्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा, मराठा समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशा विविध मागण्या करीत घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)