नाशिक जिल्ह्यातील महामार्ग ठप्प
By admin | Published: February 1, 2017 01:48 AM2017-02-01T01:48:58+5:302017-02-01T01:49:14+5:30
नाशिक जिल्ह्यातील महामार्ग ठप्प
नाशिक : मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मुंबई - आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने चक्का जाम करण्यात आल्याने मोर्चाप्रमाणेच हे आंदोलन-देखील शांततेत पार पडले. तथापि, यानंतरही अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. नाशिक जिल्ह्यात सटाणा, देवळा, येवला, कळवण, निफाड, मनमाड, चांदवड, मालेगाव, लासलगाव व सिन्नर तालुक्यात नाशिक शहरात आडगाव मार्गावर जत्रा हॉटेल, सिन्नर फाटा, सातपूर, विल्होळी, पेठरोड तसेच सिडकोतील त्रिमूर्ती चौक आदि ठिकाणी आंदोलने करण्यात आली. प्रामुख्याने मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅक्टर आडवा लावून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात युवक, युवती, महिला, पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. नाशिक शहरात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी टाळ-मृदंगाच्या तालात भजन करीत मुंबईआग्रा महामार्ग अडविला. यावेळी तरुणाईने ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्वच ठिकाणी आंदोलकांनी कोपर्डी हत्त्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा, मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशा विविध मागण्या करीत घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना वारंवार रस्ता खुला करण्याचे आवाहन केले. परंतु आंदोलक चक्काजामच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी पोलिसांना शांततापूर्ण विरोध करीत आंदोलन सुरूच ठेवले. अखेर पोलिसांनी शीघ्रकृती दलाच्या मदतीने आंदोलकांना रस्त्यावरून हटविण्यासाठी बळाचा वापर सुरू केल्याने आंदोलक संतप्त झाले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग घडल्याने काही आंदोलकांनी समजदारीची भूमिका घेत राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप केला. नाशिक शहरात व्दारका चौफुली तसेच नाशिकरोड येथील सिन्नरफाटा येथेही रास्ता रोको करण्यात आल्याने मुंबई आग्रा महामार्गाबरोबर नाशिक पुणरोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. सिडकोतील त्रिमुर्ती चौक तसेच सातपूर येथे देखील रास्ता रोको करण्यात आले. आंदोलन शांतते पार पडल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची केवळ नावांची नोंद घेऊन सोडून देण्यात आले तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांंना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. (प्रतिनीधी)