न्यायप्रविष्ट जागेत महामार्ग विस्तारीकरण

By Admin | Published: November 3, 2016 11:49 PM2016-11-03T23:49:35+5:302016-11-03T23:52:26+5:30

महापालिका अनभिज्ञ : गडकरींच्या हस्ते उद्या भूमिपूजन

Highway widening in judicial space | न्यायप्रविष्ट जागेत महामार्ग विस्तारीकरण

न्यायप्रविष्ट जागेत महामार्ग विस्तारीकरण

googlenewsNext

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौकात असलेल्या पादचारी मार्गाचा निकास स्थलांतरित करत पुण्याकडून येणारी वाहतूक मुंबईकडे वळविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत महापालिकेच्या मालकीच्या ज्या जागेचा वापर केला जाणार आहे, ती जागाच न्यायप्रविष्ट असल्याने येत्या शनिवारी (दि. ५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणारा भूमिपूजन सोहळा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने मात्र सदर कार्यक्रमाबाबत अनभिज्ञता दर्शविल्याने महामार्ग प्राधिकरण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
द्वारका चौफुलीवर उड्डाणपुलाखालील भुयारी पादचारी मार्गाचा उपयोगच होत नसल्याने त्यातील त्रुटींचा विचार करण्यात आला. त्यानुसार, सदर पादचारी मार्गाचा निकास स्थलांतरित करण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणने घेतला. तसेच महामार्ग प्राधिकरणने पुण्याहून येणारी वाहतूक चौफुलीवर न येता ती हनुमान मंदिरामागील जागेतून जिल्हा बॅँकेसमोरील उड्डाणपुलाकडे वळविण्याचा आराखडा तयार केला. सदर हनुमान मंदिरही स्थलांतरित करण्याची त्यात योजना आहे. मात्र, ज्या जागेत महामार्ग प्राधिकरण काम करणार आहे ती जागा महापालिकेच्या मालकीची असून सदर जागेबाबतचा वाद न्यायप्रविष्ट आहे. द्वारका चौफुलीलगत महापालिकेच्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिकांनी विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.
महापालिकेने सदर व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर सुमारे ३३ व्यावसायिकांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे सदर बाब न्यायप्रविष्ट आहे. असे असताना महामार्ग प्राधिकरणकडून महापालिकेच्या जागेतून मार्ग काढला जाणार असल्याने सदर प्रकरण वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Highway widening in judicial space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.