महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला होणार हिलस्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:23 AM2020-02-01T00:23:15+5:302020-02-01T00:23:54+5:30
नाशिक : लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावे यासाठी अभ्यास सुरू असून, त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटींची मागणी करण्यात आली आहे.
नाशिक : लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावे यासाठी अभ्यास सुरू असून, त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटींची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळाला नाही तर पर्यटन विभागाकडून निधी घेऊ, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हावार आढावा बैठका घेण्याचा कार्यक्रम सुचवला आहे. त्यामध्ये घरकुल, रखडलेले जलसिंचन, वीजपुरवठा प्रलंबित प्रश्नांवर आढावा, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल आढावा, पंतप्रधान घरकुल योजना, आदिवासी विकास योजनांबाबत आढावा यासह विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात येणार आहे. माजी खासदार समीर भुजबळ व माझ्या काळात तयार झालेले अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षांत रखडलेले आहे. त्यात कलाग्राम, बोटक्लब, रिसॉर्ट, टुरिझम हब, वेलनेस हब, ट्रेकिंग युनिट, पर्यटनाची कामे आणि अपूर्ण काम आहेत त्यावर या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असून, नाशिक विमानसेवेबाबत काही अडचणी आहेत त्यावरदेखील चर्चा केली जाईल. शरद पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे अर्थातच काँग्रेसच्या नेत्यांनी हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे इतिहासात काही गोष्टी आहेत. मात्र त्या गोष्टी बाजूला ठेवून सरकारने काम करायला हवे. सरकारी पक्ष अडचणीत येणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असून, सतत काहीतरी बोलणे चांगले लक्षण नाही, दुसरेही पक्ष आहेत असे समजूनच वक्तव्य करणे महत्त्वाचे असून, काय बोलावे व काय नाही यासाठी प्रसंगी आपण सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करू, असेही भुजबळ यांनी सांगितले.