हिमांशू रॉय यांची धडाकेबाज कामगिरी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:47 AM2018-05-12T00:47:24+5:302018-05-12T00:47:24+5:30
भारतीय पोलीस सेवेत १९८८ मध्ये दाखल झालेले हिमांशू रॉय यांचा नाशिक शहर व जिल्ह्याशी तसा जवळचा संबंध राहिला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था हाताळणीत नेहमीच अग्रेसर राहिलेले रॉय यांनी अनेक मोठ्या व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यातही हातखंडा राहिला आहे.
नाशिक : भारतीय पोलीस सेवेत १९८८ मध्ये दाखल झालेले हिमांशू रॉय यांचा नाशिक शहर व जिल्ह्याशी तसा जवळचा संबंध राहिला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था हाताळणीत नेहमीच अग्रेसर राहिलेले रॉय यांनी अनेक मोठ्या व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यातही हातखंडा राहिला आहे. परिविक्षाधिन काळात नाशिक ग्रामीण पोलीस दलात मालेगावसारख्या संवेदनशील ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या रॉय यांनी जवळपास १७ वर्षे नाशिकशी आपला स्नेह कायम ठेवत पोलीस खात्यातील अनेक सहकाऱ्यांसोबतच मित्र, हितचिंतक जमा केले होते. सन १९९२ मध्ये हिमांशू रॉय यांची मालेगावी अपर अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. धार्मिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या मालेगाव शहरात तसे नवखे म्हणून दाखल झालेल्या रॉय यांनी सूत्रे हाती घेताच मालेगावच्या अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात करून भल्या भल्या गुंडांना जेलमध्ये डांबले होते. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीची दखल घेत १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात रॉय यांना नाशिक पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली. त्याकाळी जिल्ह्णात डोके वर काढलेल्या इंधन भेसळ टोळीची पाळेमुळे खणण्याचे मोठे व अवघड काम त्यांनी हाती घेतले. या अवैध धंद्यात सहभागी झालेल्यांना कायद्याचा हिसका दाखवित असतानाच राज्यात खळबळ उडवून देणाºया मालेगावच्या सोयगाव भागात ‘सप्तशृंगी फार्म’मध्ये झालेल्या पाटील हत्याकांडातील आरोपींचा कोणताही सुगावा नसतानाही त्याचा उलगडा करण्यात रॉय यांना यश आले होते. सुपडू पाटील यांच्या कुटुंबातील सहा जणांचे हत्याकांड त्यांचाच भाऊ व पुतण्याने केला होता. चिखलात सापडलेल्या घराच्या कुलपाच्या किल्लीच्या आधारे या हत्याकांडातील आरोपींचा त्यांनी शोध घेतला व त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचविले. याच काळात जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, हरसूल, त्र्यंबक शिवारात फोफावलेल्या पीपल्स वॉर ग्रुप या जहाल नक्षलवादी चळवळीचे मोठे आव्हान रॉय यांनी मोठ्या शिताफीने पेलले. बनावट नोटा तयार करून देशपातळीवर त्याचे रॅकेट चालविणाºया एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचे यशही त्यांच्या नावावरच जाते. पेठ रस्त्यावर एका पेट्रोलपंपावर डिझेल भरलेल्या चालकाने ५० रुपयांची बनावट नोट पंपचालकाला दिली, त्यावेळी सुतावरून स्वर्ग गाठण्याची खरी किमया रॉय व त्यांच्या सहकाºयांनी केली. कर्नाटकातील बिदर जिल्ह्णातून तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कालेकर याच्यासह जवळपास डझनभर आरोपींना अटक करण्यात नाशिक ग्रामीण पोलीस दलाला यश आले होते. त्यावेळी बनावट नोटा छपाई करणारे यंत्र व सुमारे ८५ लाखांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या होत्या. याच काळात पिंपळगाव बसवंत येथे अमोल बनकर या शाळकरी विद्यार्थ्याच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सापडत नसल्याचे पाहून पोलीस खात्यावर आलेली बदनामीची नामुष्की रॉय यांनी तपासात केलेल्या मार्गदर्शनामुळे पुसली गेली होती. आपला साडेतीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून हिमांशू रॉय यांनी नंतर नगर जिल्ह्याचे पोलीसप्रमुख म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. नाशिक पोलीस आयुक्त म्हणून २००४ मध्ये हिमांशू रॉय यांनी सूत्रे स्वीकारली. सिंंहस्थ कुंभमेळा नुकताच पार पडून गेला असताना नाशकात दाखल झालेल्या रॉय यांच्यासमोर शहरातील गुन्हेगारी कारवाया व गुंडांनी घातलेल्या थैमानाचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हातोहात लांबविणाºया टोळीने मांडलेला उच्छाद पाहता, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंटी शर्मा या सराईत सोनसाखळी चोराचा एन्काउंटर करण्याची कारवाई रॉय यांच्या कार्यकाळात घडली. नाशिक पोलीस आयुक्तालयातील हे पहिले पहिले एन्काउंटर होते. सिडको परिसरात घराबाहेर झोपलेल्या लहान बालिकांना पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार व नंतर खून करणाºया स्वप्निल निकम या सराईत गुन्हेगाराचा छडा लावण्याच्या शोधकार्यात हिमांशू रॉय यांचे मोठे योगदान होते. नाशिक पोलीस आयुक्त म्हणून सलग तीन वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर सन २००८ मध्ये शहरात पोलिसांच्या हाताबाहेर गेलेल्या गुन्हेगारी टोळ्यांना वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा हिमांशू रॉय यांना दुसºयांदा पोलीस आयुक्त म्हणून पाठविले. त्यांच्या काळातच शहरातील चांगले टोळीविरुद्ध मोक्कान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस धजावले होते. अतिशय शिस्तप्रिय व सहकारी पोलीस अधिकाºयांच्या कायम पाठीशी उभे राहणाºया हिमांशू रॉय यांचे नाशिक जिल्ह्णातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असलेले योगदान विसरता येणार नाही, कारण सध्याचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल हे ज्यावेळी परिविक्षाधीन अपर पोलीस अधीक्षक म्हणून नाशिक ग्रामीणमध्ये रुजू झाले त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक हिमांशू रॉय हेच होते!