‘स्वरदा’ची हिंदी-मराठी गीतांची सुरेल मैफल
By Admin | Published: October 16, 2014 09:26 PM2014-10-16T21:26:20+5:302014-10-17T00:11:28+5:30
‘स्वरदा’ची हिंदी-मराठी गीतांची सुरेल मैफल
नाशिक : गेल्या तेवीस वर्षांपासून सुगम गायनाचे धडे देणाऱ्या स्वरदा म्युझिक अकॅडमीच्या वतीने आयोजित हिंदी-मराठी गीतांच्या सुरेल मैफलीत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्यातील गानसाधनेचे दर्शन घडविले.
प. सा. नाट्यगृहात स्वरदा म्युझिक अकॅडमीच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘गाणी तुमची आमची’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफलीचा प्रारंभ संत सूरदासांच्या ‘दीनन दुख हरन देव’ या प्रार्थनेने झाला. अकॅडमीच्या संचालक व गायिका शुभदा तांबट व सहकाऱ्यांनी ही प्रार्थना सादर केली. त्यानंतर गौरी उपासनी यांनी ‘पूनवेचा चंद्रम’ हे गीत सादर केले. दीपाली ठोंबरे व विद्यार्थ्यांनी ‘इन्साफ की डगरपे’ हे गीत पेश करत उपस्थितांकडून दाद मिळविली.
ऋतुजा जोशी हिने ‘मजसी येणे’ हे गीत आपल्या खास शैलीत सादर केले. प्रियंका कोठावदे यांनी ‘गिरीधर के घर’, श्रीमती पुष्पा देशमुख यांनी ‘रानात सांग’, साधना भागवत यांनी ‘छबीदार छबी’, रोहिणी पांडे यांनी ‘आला वसंत ऋतू’, अश्वदीप खोब्रागडे याने ‘आम्ही ठाकर ठाकर’, कल्पेश भट व हितेंद्रने ‘अष्टविनायक’, संपदा दोंदे, वैभवी कसरेकर व जयश्री महाजन यांनी ‘जरा ओलसर’, शशांक देशपांडे यांनी ‘त्या कोवळ्या’, तर कौस्तुभ, किरण मेतकर व यश वाणी यांनी ‘छूकर मेरे’ हे गीत सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवले. रश्मी कुंटे व आरोही मेतकर यांच्या वाद्यवादनालाही दाद मिळाली. साथसंगत शुभदा तांबट (संवादिनी), निनाद तांबट (सिंथेसायझर), नवीन तांबट व सुहास खरे (तबला व ढोलकी) यांनी केली. वैशाली जोशी यांनी निवेदन केले. (प्रतिनिधी)