हिंदुस्तानच्या मातीतच हिंदुत्वाचा ‘डीएनए’; लवकरच राममंदिरची उभारणी, नाशिकच्या इस्कॉन मंदिरात सुब्रह्मण्यम स्वामी यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 03:51 PM2017-11-12T15:51:52+5:302017-11-12T16:18:18+5:30
हिंदू आतंकवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण या धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता असून हा ग्रंथ आतंकवादाची शिकवण देत नाही, हे त्या चिदंबरमने लक्षात घ्यावे, त्याला खरा हिंदू आतंकवाद काय असतो, याचा अनुभव लवकरच येणार असून चिदंबरमला तुरूंगात पाठविण्याची मी तयारी केली आहे
नाशिक : हिंदुस्तान हा हिंदूंचाच देश आहे, म्हणून तर मी ‘हिंदुस्तान’ म्हणतो, या देशाच्या मातीतच हिंदुत्वाचा ‘डीएनए’ आहे. राममंदिराच्या उभारणीमध्ये कुठलाही अडथळा आणू नये, असे प्रतिपादन भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले.
नाशिक येथील श्री राधा मदनगोपाल ‘इस्कॉन’ मंदिरात भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी स्वामी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर आमदार देवयानी फरांदे, मंदिराचे विश्वस्त शिक्षाष्टकम प्रभू उपस्थित होते. यावेळी स्वामी यांनी हिंदीतून भाषणाला सुरूवात करताच अयोध्येमधील राम मंदीर उभारणीच्या मुद्दयाला हात घातला. अयोध्येत राममंदीरासह मथुरा आणि वाराणसीमध्येही मंदीर बांधणार असून याबाबत लवकरच उच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. मुस्लीमांनी या कार्याला पाठिंबा द्यावा, मंदीर उभारणीमध्ये कुठलाही अडथळा निर्माण करु नये. मुघलांनी या देशात साडेसातशे वर्षे सत्ता गाजविली तरीदेखील देशात हिंदू धर्म अस्तित्वात राहिला, याचे एकमेवर कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते राजस्थानच्या महाराणाप्रताप यांच्यापर्यंत विविध योध्दांनी दिलेला लढा आहे, असेही स्वामी यावेळी म्हणाले. दरम्यान, हिंदू आतंकवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण या धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता असून हा ग्रंथ आतंकवादाची शिकवण देत नाही, हे त्या चिदंबरम यांनी लक्षात घ्यावे, खरा हिंदू आतंकवाद काय असतो, याचा अनुभव लवकरच येणार असून चिदंबरम यांना तुरूंगात पाठविण्याची मी तयारी केली आहे, असा टोलाही स्वामीने त्यांच्या खास शैलीत चिदंबरम यांना लगावला.
कॉँग्रेसवाल्यांना तिहारची सफर घडविणार
कॉँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या त्या सर्वांना तिहार तुरूंगाची सफर आगामी निवडणूकीपर्यंत घडविणार आहे. पी.चिदंबरम यांनी तर हिंदू दहशतवाद म्हणण्याचा अधिकारच नाही. त्याला तुरूंगवास लवकरच भोगावा लागणार असून मी त्याची पुर्ण तयारी केली आहे. मी धर्म-संस्कृतीचा रक्षणकर्ता असून मी सत्य बोलणारा आहे. सर्व भ्रष्टाचा-यांना आणि निधर्मींची व्यवस्था तुरूंगात करावी लागणार आहे.