कळवण तालुक्यातील हिरवे गाव : लोकसहभागातून १०० टक्के हगणदारीमुक्त, स्वच्छतेकडून समृद्धीकडे भैताणे दिगरची आदर्श गावाकडे यशस्वी वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:13 AM2018-01-17T00:13:55+5:302018-01-17T00:18:39+5:30
कळवण : संपूर्ण गावातील घरांना हिरवा रंग, स्वच्छ भारत अभियानांतर्गतच्या शौचालयांना गुलाबी, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या शौचालयांना पिवळा रंग...
कळवण : संपूर्ण गावातील घरांना हिरवा रंग, स्वच्छ भारत अभियानांतर्गतच्या शौचालयांना गुलाबी, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या शौचालयांना पिवळा रंग... लोकसहभागातून संत तुकाराम वनग्राम योजनेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविणारे कळवण तालुक्यातील भैताणे दिगर या गावाने विकासाकडे वाटचाल सुरू केली असून, शासकीय योजनांचा पुरेपूर फायदा घेत गावाने सर्वच क्षेत्रात प्रगती केल्यामुळे सध्या हे गाव तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. लोकसहभागातून संत तुकाराम वनग्राम योजनेत राज्यात तिसरा क्रमांक, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियानाचे बक्षीस यांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या भैताणे दिगर या आदिवासी गावाने १०० टक्के गाव हगणदारीमुक्त करून स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल सुरू केली आहे. कळवण आदिवासी तालुक्यातील पश्चिम, दुर्गम भागातील भैताणे दिगर या आदिवासी गाव. एकूण ११८२ इतकी लोकसंख्या असलेल्या भैताणे दिगरने १०० टक्के हगणदारीमुक्त करून तालुक्यात आदर्श निर्माण केला असून, आदर्श गावाकडे वाटचाल सुरू केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना राबवून गाव स्वच्छतेतून समृद्धीकडे नेले आहे. या ग्रामपंचायतींतर्गत शेरी दिगर हे गाव समाविष्ट असून, दोन्ही गावे डोंगर टेकडीवर वसलेली आहेत. त्यामुळे गावाच्या सौंदर्यात नैसर्गिक भर पडली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्याबरोबरच सरपंच पोपट गायकवाड यांनी पाणी, रस्ते, शिक्षण, सिंचन, वीज, आरोग्य आदी मूलभूत प्रश्नांची सोडवणूक केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मौजे भैताणे दिगर येथे सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून, शेरी दिगर येथील सभामंडपाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. गावासाठी उपसरपंच बेबीबाई पवार, सुमनबाई पालवी, झेलूबाई ठाकरे, चंदर पवार, आनंदा देशमुख, राधाबाई पवार, शिक्षक वाघ, बिरारी, सोमनाथ गायकवाड , अंबादास देशमुख, कृष्णा ठाकरे आदींसह ग्रामस्थ विकासाच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकत आहेत. गावाचे खास वैशिष्ट म्हणजे संपूर्ण गावातील घरांना एकसारखा हिरवा रंग देण्यात आला आहे. शौचालयाला गुलाबी, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या शौचालयांना पिवळा रंग असा एक नवीन पॅटर्न पोपट गायकवाड यांनी सुरु केला आहे.
़़़म्हणून बांधले प्रत्येक घरी शौचालय
गाव हगणदारीमुक्त होण्यापूर्वी गावातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन ‘प्रत्येक घरी देवालय ..म्हणून आम्ही बांधले प्रत्येक घरी शौचालय’ असा पण केला व २०१६ साली गाव हगणदारीमुक्त झाले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ग्रामपंचायतीला ६६ लाभार्थींना १२ हजारप्रमाणे ७ लाख ५२ हजार रु पये इतके प्रोत्साहन अनुदान, तर रोजगार हमी योजनेअंतर्गत १२ हजार प्रमाणे ५८ लाभार्थींनी वैयक्तिक शौचालय बांधून अनुदान मिळविले आहे. गावातील कचºयाचे विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ठिकठिकाणी मोठ्या कचराकुंडी तसेच भूमिगत शोषखड्डे केले आहेत.