इतिहास संग्रहालयाला मिळणार चालना
By admin | Published: November 15, 2015 11:17 PM2015-11-15T23:17:24+5:302015-11-15T23:18:12+5:30
इतिहास संग्रहालयाला मिळणार चालना
नाशिक : महापालिकेच्या वतीने गंगापूररोडवरील पंपिंग स्टेशनमधील जागेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संग्रही असलेल्या शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय साकारण्याच्या संकल्पनेला चालना मिळणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी सदर वस्तुसंग्रहालय हेच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक राहणार असल्याचे यापूर्वीच घोषित केले असल्याने वस्तुसंग्रहालयाच्या रूपाने बाळासाहेबांचेही स्मारक आकारास येणार आहे.
राज ठाकरे यांचे कुटुंबीयांसह तीन दिवसांच्या नियोजित दौऱ्यासाठी शनिवारी सकाळी नाशिकला आगमन झाले, परंतु उद्योजक संजीव बाफना यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून ठाकरे कुटुंबीयांनी दुपारी पुन्हा मुंबईकडे प्रयाण केले. राज ठाकरे रविवारी सायंकाळी पुन्हा नाशिकला दाखल झाले. त्यांच्यासमवेत दौऱ्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हेही होते. दरम्यान स्मारकाची पाहाणी केल्यानंतर बाबासाहेबांनी हिरवा कंदील दाखविल्यास खऱ्या अर्थाने संग्रहालयाला व बाळासाहेबांच्या स्मारकाला आकार येणार आहे.
जून महिन्यात बाबासाहेब पुरंदरे यांचे सुपुत्र प्रसाद पुरंदरे यांनी नाशिक इतिहास संग्रहालयाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष बाबासाहेब भेट देऊन पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. सुमारे दीड वर्षापूर्वीच सदर जागेत बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडील शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय साकारण्याची संकल्पना राज यांनी मांडली होती. (प्रतिनिधी)