हिट अँण्ड रन : नाशिकमध्ये मद्यधुंद वाहनचालक सुसाट; दहा दिवसांत चार पादचारी ठार
By अझहर शेख | Updated: July 10, 2024 17:03 IST2024-07-10T17:03:31+5:302024-07-10T17:03:55+5:30
शहर पोलिसांकडे एकूण ६० ते ६५ ब्रेथ ॲनालायझर असून, ते मागील काही दिवसांपासून जणू धूळखात पडले आहेत की काय, असे बोलले जात आहे.

हिट अँण्ड रन : नाशिकमध्ये मद्यधुंद वाहनचालक सुसाट; दहा दिवसांत चार पादचारी ठार
नाशिक : शहर व परिसरात रस्ते अपघातामध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. यामध्ये दारू पिऊन वाहने चालविल्यामुळे ‘हीट अँड रन’च्या घटनाही घडल्या आहेत. कार चालक, दुचाकी चालक, टेम्पो चालक व काही रिक्षा चालक बस चालकसुद्धा मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवीत असल्याचे दिसते. दहा दिवसांत चार पादचारी ठार, तर पाचपेक्षा जास्त दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मद्यधुंद व सुसाट चालकांविरुद्ध सर्व १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. शहर पोलिसांकडे एकूण ६० ते ६५ ब्रेथ ॲनालायझर असून, ते मागील काही दिवसांपासून जणू धूळखात पडले आहेत की काय, असे बोलले जात आहे.
नाशिक शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अपघाताच्या घटना महामार्गापेक्षाही जास्त वाढल्याचे दिसून येत आहे. एकीकडे सुरू असलेली रस्त्यांची कामे, तर दुसरीकडे दारू ढोसत बेदरकारपणे वाहने दामटविणारे वाहन चालक यांच्यामुळे नाहक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवाजीनगर रस्त्यावर मद्यधुंद कार चालकाने मंगळवारी पादचारी महिलेचा बळी घेतला. त्यानंतर सिटी लिंकच्या मद्यपी बस चालकाने नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीत बुधवारी (दि.१०) बेदरकारपणे बस रिव्हर्स घेत आजोबासोबत पायी जाणाऱ्या चिमुकलीला चिरडले. यावरून सिटी लिंकच्या बसच्या चालकांचीसुद्धा ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रविवारी (दि.७) येवलेकर मळ्याच्या परिसरात बाइज टाउन रस्त्यावर सायंकाळी भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या पादचारी महिला निधी नीलेश वारे (४९, रा.गिरीराज अपार्टमेंट, कॉलेज रोड) यांना पाठीमागून सुसाट आलेल्या मिनी टेम्पोने (एम. एच.१५ एच. एच. २७२५) जोरदार धडक देत घटनास्थळावरून पलायन केले. या दुर्घटनेत वारे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने अतिरक्तस्राव हाेऊन त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेत टेम्पो चालक अपघातग्रस्त वाहनासह फरार झाला आहे. रविवारी (दि.७) रात्री ११ वाजेच्या सुमारास विसेमळ्याजवळ कॉलेज रोड याठिकाणी सुसाट कार चालकाने पाठीमागून दुचाकीस्वारांना धडक दिली. या धडकेत सटाणा तालुक्यातील ताहराबाद व नामपूर येथील रहिवासी युवक चेतन संजय चव्हाण (३१), मयूर दिगंबर नंदन (२७) हे दोघे मित्र गंभीररीत्या जखमी झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळाहून फरार झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.