उन्हाचा बसला तडाखा, भेट द्या उष्माघात कक्षाला
By Suyog.joshi | Published: April 9, 2024 07:15 PM2024-04-09T19:15:02+5:302024-04-09T19:16:20+5:30
भर उन्हाळ्यात कमी पाणी पिऊन घराबाहेर पडले तर उष्माघात होईल, तसेच पाण्याच्या अभावामुळे होणाऱ्या अनेक रोगांचा सामना करावा लागेल.
गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढत्या उन्हाळ्यामुळे सतर्कता म्हणून महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, बिटको रुग्णालयात उष्माघात (हीट स्ट्रोक) कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासोबतच झाकिर हुसैन, मायको सर्कल, मोरवाडी येथील रुग्णालयात प्रत्येकी पाच बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणाला याबाबत लक्षण जाणवल्यास जवळच्या पालिका रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहे.
हवामान विभागाने नुकतीच उष्णतेची लाट येणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली आहे. भर उन्हाळ्यात कमी पाणी पिऊन घराबाहेर पडले तर उष्माघात होईल, तसेच पाण्याच्या अभावामुळे होणाऱ्या अनेक रोगांचा सामना करावा लागेल. थायरॉईडची समस्या असेल तर उन्हात उष्माघात होण्याची शक्यता असते. थायरॉईड असंतुलनामुळे रक्तदाब बदलल्यास थकवा जाणवतो. जंकफूडमध्ये मोनोसोडियम, ग्लुटामेंटसह गरम आणि हानिकारक पदार्थ असतात. ज्यामुळे शरीर उष्माघाताचा सामना करू शकत नाही. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने महापालिका सतर्क झाली आहे. शहरात सकाळपासून सायंकाळपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उन्हामुळे नागरिकांच्या तब्येतीत बिघाड होत असल्याची उदाहरणे आहेत. शहराचा पारा चाळिशीपर्यत येतो आहे. कमालीच्या वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे. हे पाहून महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उष्माघात कक्ष सज्ज करण्यात आला आहे.
प्राथमिक लक्षणे काय ?
थकवा येणे, उच्च अथवा कमी रक्तदाब, चक्कर येणे, उलट्या होणे, स्नायूंमध्ये कडकपणा, सतत घाम येणे, त्वचेवर पुरळ, डोकेदुखी, श्वास घेण्यास समस्या, भीती व अस्वस्थ वाटणे.
उन्हाळ्यात उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. भर दुपारी बारा ते पाचपर्यंत गरोदर, ज्येष्ठ नागरिकांंनी बाहेर पडू नये. घरातीलच थंड पेय घ्यावे. शरीराला शीतपेय देखील अशावेळी, जास्तीत जास्त पाणी पिण्याबरोबरच डोक्यावर रूमाल अथवा टोपी वापरावी.
-डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा