ताण हलका करण्यासाठी ‘खाकी’मध्येही जोपासला जातो छंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:14 AM2021-05-09T04:14:34+5:302021-05-09T04:14:34+5:30

शहर पोलीस दलात कोणी विविध प्रकारचे वाद्य वाजवितात, तर कोणी गायनाचा छंद जोपासलेला आहे. यामध्ये केवळ अधिकारी वर्गच आहे, ...

Hobby is also practiced in khaki to relieve stress | ताण हलका करण्यासाठी ‘खाकी’मध्येही जोपासला जातो छंद

ताण हलका करण्यासाठी ‘खाकी’मध्येही जोपासला जातो छंद

Next

शहर पोलीस दलात कोणी विविध प्रकारचे वाद्य वाजवितात, तर कोणी गायनाचा छंद जोपासलेला आहे. यामध्ये केवळ अधिकारी वर्गच आहे, असे नाही, तर कर्मचाऱ्यांनाही वेगवेगळ्या छंदांची गोडी लागलेली दिसून येते. मागील वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे ‘खाकी’पुढील आव्हाने अधिकच वाढली असून, ही आव्हाने लीलया पेलण्यासाठी कठोर परिश्रम पोलीस दलाला करावे लागत आहे. यामुळे छंदाची आवड जरी असली तरी हा छंद पूर्ण करण्यासाठी वेळ मिळणेही आता दुरापास्त झाले आहे. यामुळे कधी रजेच्या कालावधीत, तर कधी सुटीच्या दिवशी वेळात वेळ काढून ‘खाकी’तील छंदवेडे आपल्या वेगळ्या दुनियेत काही वेळ का होईना रमण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.

----

तबलावादनाने होतो ‘रिलॅक्स’

आई-वडील वारकरी असल्यामुळे त्यांच्यासोबत विविध कार्यक्रमात जात असताना वाद्यांचे आकर्षण वाढले आणि त्यातूनच तबलावादनाकडे वळलो. पोलीस खात्यात नोकरी करताना तबलावादनामुळे कामाचा ताण कमी होण्यास मदत होते. सुटीच्या दिवशी लहान कन्येच्या साथीने किंवा मी एकटाच तबलावादनाच्या छंदात रमतो आणि रिलॅक्स होतो.

- डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

---

व्यायाम-प्राणायामाने ताण हलका

खाकीमुळे दहा वर्षांपूर्वी मी योगा-प्राणायाम आणि व्यायामाकडे वळलो. हा छंद जोपासताना मी अत्यंत प्रामाणिक राहिलो आहे. दररोज पहाटे तासभर तरी यासाठी मी वेळ देतो. मध्यरात्री जरी झोपलो तरी पहाटे पाच वाजता उठण्याची सवय या छंदापायी लागली. या छंदामुळे शारीरिकदृष्ट्या सुदृढता तर लाभलीच आहे, मात्र कामाचा ताणही हलका होतो.

- साजनकुमार सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

--

घोडेस्वारीतून मिळतो आनंद

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना नागपूरला एका संस्थेच्या घोड्यांच्या अस्तबलमध्ये नोकरी मिळाली. लहानपणापासून घोड्याची आवड असल्याने ती नोकरी स्वीकारली. विविध घोडे हाताळण्यास मिळाले. तेव्हापासून घोडेस्वारीचा छंद जडला. पोलीस दलात आल्यानंतर हा छंद अधिकच पक्का झाला. नोकरीची वेळ जरी निश्चित नसली तरी सुटीच्या दिवशी किंवा रजेच्या कालावधीत घोडेस्वारीसाठी आवर्जून वेळ काढतो.

-अंचल मुदगल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

----आलेख--

पोलीस अधिकारी- २१०

पोलीस कर्मचारी-३०१६

-----

फोटो : डमी फॉरमेट आर वर ०८पोलीस हॉबी नावाने सेव्ह केला आहे.

Web Title: Hobby is also practiced in khaki to relieve stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.