शहरात विविध ठिकाणी भीक मागणारी २२ मुले ताब्यात
By admin | Published: December 24, 2015 12:25 AM2015-12-24T00:25:21+5:302015-12-24T00:26:45+5:30
चाइल्ड लाइन व पोलिसांची मोहीम : बालसुधारगृहात रवानगी
नाशिक : सिग्नल, रेल्वेस्थानक, गंगाघाट व शहर परिसरातील विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या महिला व लहान मुलांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांनी व चाईल्ड लाईनच्या मदतीने बुधवारी (दि़ २३) शहरात संयुक्त मोहीम राबविली़ या मोहिमेत शहरातून सुमारे २० ते २२ भिकारी मुले ताब्यात घेण्यात आली असून, त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे़ तर मुलांसोबत ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांना न्यायालयाने जामीन दिला असून मुलांना ताब्यात घेण्यासाठी त्यांनी न्यायालयात गर्दी केली होती.
सीबीएस, शालिमार, त्र्यंबक नाका, बिटको चौक, शरणपूररोड, शरणपूररोड पोलीस चौकी, गंगापूररोड तसेच शहरातील बहुतांशी वाहतूक सिग्नलवर लहान मुलांना कड्यावर घेऊन महिला भीक मागताना दिसतात़ या दयनीय अवस्थेतील बालकांना बघून दयेपोटी पैसे देणाऱ्यांचीही कमी नाही़ मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात या भिकाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली होती़ या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासन व चाइल्ड लाइन यांच्यात संयुक्त मोहिमेबाबत तयारी सुरू होती़
शहरात बुधवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शहरातील अकरा पोलीस ठाणी व रेल्वे पोलीस यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते़ या मोहिमेत त्र्यंबक नाका, सीबीएस, बिटको चौक, शरणपूररोड पोलीस चौकी व गंगाघाटावर भीक मागताना लहान मुले व महिला मोठ्या संख्येने आढळून आल्या. पंचवटी आणि सरकारवाडा या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २१ भिकारी मुले सापडली़
दरम्यान, नऊ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भिकारी मुले सापडली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ दरम्यान, बहुतांशी पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांना या मोहिमेबाबत माहितीच नसल्याचे समोर आले असून ही मोहीम केवळ देखावा तर नव्हता ना, अशी चर्चा सुरू झाली आहे़ (प्रतिनिधी)