हिंदुस्थान नॅशनल ग्लासच्या कंत्राटी कामगारांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:31 PM2019-12-26T22:31:49+5:302019-12-26T22:32:53+5:30
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास कारखान्यातील १५४ कंत्राटी कामगार १ सप्टेंबर २०१९ पासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करीत असून, व्यवस्थापनाने जुलै महिन्यापासून पगार व बोनस कपातीसह अन्य अटी घातल्याने हे आंदोलन केले जात असल्याचे कामगारांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास कारखान्यातील १५४ कंत्राटी कामगार १ सप्टेंबर २०१९ पासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करीत असून, व्यवस्थापनाने जुलै महिन्यापासून पगार व बोनस कपातीसह अन्य अटी घातल्याने हे आंदोलन केले जात असल्याचे कामगारांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
विष्णू लोंढे, संदीप मोरे, भगवान उबाळे, पंकज शिंदे, कैलास गोरे यांच्यासह अनेक कामगार आंदोलनात सहभागी झाले आहेत. हे सर्व कामगार २३ वर्षांपासून काम करत असून, त्यांनी ‘सिटू’ चे सभासदत्व घेतले आहे. ‘सिटू’च्या माध्यमातून पगारवाढ व इतर सुविधांबाबत पाठपुरावा सुरू केल्याने व्यवस्थापनाने सुडबुद्धीने पगारात कपात करून कामगारांना कामावर घेण्यास मनाई केल्याचे निवेदनात म्हटले आहे. १६ जुलै २०१९ ला व्यवस्थापनाने पगार, बोनस कमी करून युनियन सोडण्यास सांगितल्याचा कामगारांचा आरोप असून यंदाचा बोनसही देण्यात आला नाही. उलट व्यवस्थापनाने सप्टेंबरपासून कामगारांना प्रवेशद्वार बंद केले. व्यवस्थापनाच्या अटी मान्य केल्या तरच कामावर येण्यास सांगण्यात आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ
कामगार आयुक्तांनी बोनस व वेतन करार करण्याचा आदेश देऊनही तो पाळला जात नाही असाही कामगारांचा आरोप आहे. चार महिन्यांपासून कामगार शांत असून, कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाना व्यवस्थापन, ठेकेदार मार्ग काढत नसल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, चार दिवसांत पगारवाढीचा करार करावा, कामगारांना नियमित कामावर घ्यावे. अन्यथा कामगार पुढील आंदोलन करतील व त्यानंतरच्या परिणामांना व्यवस्थापन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.