पाडळी विद्यालयात व्यसनमुक्तीची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 05:33 PM2020-03-09T17:33:29+5:302020-03-09T17:33:59+5:30
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी दुगुर्णांची होळी करत व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
गाव-परिसरातील तंबाखूच्या पुड्या, सिगारेटची रिकामी पाकिटे व जी माणसे सिगारेट, तंबाखू यांचे व्यसन करतात. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी गांधीगिरी मार्गाने पाकिटे जमा करून त्यांची होळी केली व यापुढे आम्ही गावातील तसेच परिसरातील एकाही व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाऊ देणार नाही. तसेच आम्हीही व्यसनाच्या आहारी जाणार नाही असा निश्चिय केला. तंबाखू, सिगारेट, गुटखा व समाजातील घटकात असणाऱ्या दुर्गुणाची होळी केली. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनातून या होळीचे आयोजन करण्यात आले. समाजात सध्या व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून ते शरीराला मोठया प्रमाणात हानिकारक आहे. तसेच पाश्चात्य संस्कृतीमुळे मुलांचे संस्कार कमी होत चालले आहेत म्हणून आपल्यातील दुर्गुणांना नाहीसे करणे म्हणजे दुर्गुणाची होळी करून त्याकडे पाठ फिरवून सद्गुण अंगिकारण्याचा सल्ला देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी हा संदेश प्रत्येक घराघरात पोहचविण्याचा संकल्प यावेळी केला. पाडळी परिसर हा पूर्णत: तंबाखूमुक्त व व्यसनमुक्त झाला असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे, यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून अतिशय कमी वयात विद्यार्थी ही मोहीम राबवत असल्याचे सरपंच अरूणा रेवगडे यांनी सांगितले. यावेळी विद्यालयातील ५ वी ते ९ वीच्या ३०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला व दुर्गुणांची होळी केली. यावेळी बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी.बी. शिंदे, के. डी.गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए.बी.थोरे आदी उपस्थित होते.