होळी, पाडव्यासाठी हार-कडे बनविण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 08:18 PM2021-03-18T20:18:57+5:302021-03-19T01:19:23+5:30
सायखेडा : होळी आणि रंगोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रंगाबरोबरच बाजारात साखरेच्या गाठी म्हणजे हार-कड्याचीही दुकाने सजू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर हार-कडे बनविण्याची व्यावसायिकांची लगबग सुरू आहे.
सायखेडा : होळी आणि रंगोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रंगाबरोबरच बाजारात साखरेच्या गाठी म्हणजे हार-कड्याचीही दुकाने सजू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर हार-कडे बनविण्याची व्यावसायिकांची लगबग सुरू आहे.
होळी आणि गुढी पाडव्याची चाहूल लागली, की साखरेच्या गाठ्यांचे हार-कडे बाजारात पाहायला मिळतात. अनेक कुटुंबांमध्ये या गाठी निर्मितीचा व्यवसाय परंपरागतरीत्या चालत आला आहे. अशा परंपरेतूनच अनेक व्यावसायिक गेल्या महिनाभरापासून त्यासाठी कामाला लागले आहेत. या दिवसात साखरेच्या हार-कड्यांना मोठी मागणी असल्याने या कामाला शिवरात्रीपासूनच सुरुवात होते आणि गुढीपाडव्यापर्यंत कामाची लगबग सुरू राहते. पांढऱ्या शुभ्र आणि तितक्याच चविष्ट गाठी तयार करण्यासाठी अनेक कुटुंब परिसरात प्रसिद्ध आहेत. वडिलोपार्जित नव्हे तर गेल्या चार पिढ्यांचा हा उद्योग अनेकांनी आजही तितक्याच समर्थपणे यशस्वीरीत्या पुढे चालू ठेवला आहे. या साखरगाठीची रेसिपी साधारण वाटत असली तरी या मागे मोठी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे सर्व कुटुंब या दिवसात भल्या पहाटे उठून या कामाला लागतात. अनेक वर्षाच्या या पदार्थ परंपरेमुळे होळी आणि गुढीपाडव्याला आता अशा साखर गाठींना धार्मिक महत्त्व येत आहे. ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेला हा उद्योग आजच्या मार्केटिंगच्या काळातही धडपडत का होईना शाबूत असल्याने काही कुटुंबाना वर्षातून एका महिन्याचा हा चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
इन्फो
..अशी आहे रेसिपी
सुरुवातीला एका कढईला उष्णता देऊन त्यात गरजेनुसार पाणी आणि साखर टाकली जाते. नंतर दूध टाकून ते अधिक शुभ्र आणि चवदार होईल याची काळजी घेतली जाते. पुढे हेच साखरेचे पाणी एका लाकडी साचात दोरे टाकून भरले जाते. काही वेळाने ते थंड झाले की हे लाकडी साचे वेगळे काढले जातात मग यातून तयार होतो तो साखरेचा पांढरा शुभ्र हार.
फोटो- १८ पाडवा