होळी केवळ प्रतीकात्मक स्वरुपात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:55+5:302021-03-29T04:09:55+5:30
नाशिक : होळीवरही यंदा कोरोनामुळे निर्बंध आल्याने होळीसारखा महत्वाचा सणदेखील प्रतीकात्मक स्वरुपात साजरा करण्यात आला. त्यातही बहुतांश होळ्यांच्या स्थानावर ...
नाशिक : होळीवरही यंदा कोरोनामुळे निर्बंध आल्याने होळीसारखा महत्वाचा सणदेखील प्रतीकात्मक स्वरुपात साजरा करण्यात आला. त्यातही बहुतांश होळ्यांच्या स्थानावर कोरोनापासून सुरक्षिततेचे संदेशाचे फलक किंवा कोरोना विषाणूचे चित्र काढून परंपरेतही अभिनवता जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बहुतांश मंडळांनी मोठी होळी न करता मंडळांनी छोट्या होळ्या पेटवून होलिकेला पुरणाचा नैवेद्य दाखवून नारळ अर्पण करण्यात आले.
काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तर होळीच्या सणाला गो कोरोना अशी कोरोनाच्या नावेच बोंब मारत प्रतीकात्मक होळीतही आनंद मिळवला.
मार्चच्या प्रारंभापासून कोरोनाने प्रचंड वेग पकडल्याने होळी उत्साहात साजरी करण्याच्या बालगोपाल, तरुणाईच्या इच्छा, आकांक्षांवर पाणी पडले. यशवंत महाराज पटांगण, सरदार चौक, मालवीय चौक, गजानन चौक, शनी मंदिर चौक , नागचौकात होळी नियंत्रित स्वरुपात करण्यात आला. तसेच जुने नाशिक आणि पंचवटीतील गल्ल्यांमध्ये छोटी होळी पेटवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालण्यात आली. यंदाच्या वर्षी शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या मोठ्या होळ्या करता येणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे घरासमोर, सोसायटीतील मोकळ्या जागेत प्रातिनिधिक स्वरुपात दोन-चार गोवऱ्या रचून होळी साजरी करण्यात आली. नाशकात होळीनंतर पाचव्या दिवशी म्हणजेच रंगपंचमीलाच रंग खेळले जाण्याची परंपरा आहे. मात्र, कठोर निर्बंध लागू झाले असल्याने यंदा रहाडी किंवा सार्वजनिक रंगपंचमीवरही कोरोनाचीच छाया पडणार आहे.