महापालिकेत सुट्ट्यांचा फिव्हर, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी येईनात वेळेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:18 AM2020-12-30T04:18:57+5:302020-12-30T04:18:57+5:30

नाशिक : प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी आजवर अनेक आयुक्तांनी अनेक नियम केले, परंतु अधिकारी कर्मचारी मात्र सुधारत नाहीत. गेल्या शुक्रवारपासून ...

Holiday fever in NMC, administrative officers and employees not coming on time! | महापालिकेत सुट्ट्यांचा फिव्हर, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी येईनात वेळेवर!

महापालिकेत सुट्ट्यांचा फिव्हर, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी येईनात वेळेवर!

googlenewsNext

नाशिक : प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी आजवर अनेक आयुक्तांनी अनेक नियम केले, परंतु अधिकारी कर्मचारी मात्र सुधारत नाहीत. गेल्या शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यानेही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सुट्टीचा फिव्हर कमी झालेला नाही. अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त आणि अनेक खातेप्रमुख सुमारे अर्धा ते पाऊण तास विलंबाने आल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळले आहे.

विशेष म्हणजे कोरोनाचे निमित्त करून मुख्यालयातील पंचिंग मशीन बंद करण्यात आल्याने, त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी अशा सर्वांचेच फावले आहे.

शासनाने सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर नाशिक महापालिकेच्या कामकाजाची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या मुख्यालयातच लेटलतीफ मेाठ्या प्रमाणात असून, वेळेत येत नाहीत. मात्र, वेळेपूर्वी अगदी अचूकपणे जाणारे बहुतांश जण आहे, परंतु सकाळी कोणीही वेळेवर येत नाही. महापालिकेने सेल्फी हजेरीची व्यवस्था केली असली, तरी खातेप्रमुखांना मुख्यालयात वेळेत यावे लागते. मात्र, तेही वेळेत येत नाहीत. सोमवारी (दि.२८) ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये एक अतिरिक्त आयुक्त, दोन उपआयुक्त, दोन वैद्यकीय अधिकारी, अनेक अभियंत्यांसह अनेक कर्मचारी सव्वादहा वाजल्यानंतर दाखल झाले. त्यामुळे नागरिकांची काय कामे होणार?

इन्फो...

हजेरीची यंत्रणाच नाही

कोरोनामुळे पंचिंग हजेरी बंद करण्यात आल्यानंतर, मॅन्युअल हजेरी सुरू करण्यात आली. त्यामुळे सर्व काही गोंधळ सुरू आहे. कोणी केव्हाही येऊन काहीही टायमिंग नोंदवू शकते. खातेप्रमुखच विलंबाने येत असतील, तर कर्मचाऱ्यांचे काय? त्यातच खातेप्रमुख सांभाळून घेत असल्याने ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी स्थिती आहे.

Web Title: Holiday fever in NMC, administrative officers and employees not coming on time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.