पंतप्रधान आवास योजनेचा घरकुलाचा बेघरांना घरपोच लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 06:22 PM2019-06-30T18:22:18+5:302019-06-30T18:28:00+5:30
येवला तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचा लाभ बेघर लाभार्थींना घरी जाऊन थेट प्रशस्तिपत्र घरपोच देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेचा घरकुलाचा लाभ लाभार्थी बेघरांना घरपोच थेट प्रशस्तिपत्र देताना पंचायत समितीच्या सभापती कविता आठशेरे. समवेत प्रवीण गायकवाड, गटविकास अधिकारी अन्सार शेख, विस्तार अधिकारी गायकवाड, आहेरवाडी सरपंच बबाबाई सोनवणे, भगवान जोरावर, मच्छिंद्र देवरे आदी.
येवला : तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचा लाभ बेघर लाभार्थींना घरी जाऊन थेट प्रशस्तिपत्र घरपोच देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
येवला पंचायत समिती सभापती कविता आठशेरे व पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी थेट लाभार्थींची घरे गाठली. प्रत्येकाच्या झोपडीजवळ त्याला त्याच्या हक्काचे निवारा मंजुरी पत्र दिले. ते पत्र हातात पडल्याने लाभार्थींना मोठा आनंद झाला. यावेळी महादेववाडी, धामणगाव, आहेरवाडी या गावांना भेटी देऊन लाभार्थींना पत्र वाटप करण्यात आले. ग्रामसेवक यांच्याकडे लाभार्थीच्या करारपत्राचा नमुना देण्यात आला आहे.
नव्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या व इतर लाभार्थींसाठी ६४९ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी येवला तालुक्यात ६४९ बेघरांना निवारा मिळणार असून, तालुकानिहाय व गावनिहाय उद्दिष्ट वाटप केले आहे.
घरकुलाच्या लाभापासून वंचित असणाऱ्या लाभार्थींची यादी शासनाकडे मागणी पत्र पाठविले आहे. त्यात यावर्षी २२८ घरकुले रमाईमधून व पुढील वर्षी ३६० घरकुलांचे वैशिष्ट्य पंचायत समितीकडून शासनाला पाठविले आहे. येवला तसेच आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा करून आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजनेचाही लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
९० व्या वर्षी घरकुलाचे स्वप्न साकार
आहेरवाडी येथे ९० वर्षे झालेल्या आजींना घरकुल मंजुरीचे प्रशस्तिपत्र दिल्यानंतर त्यांना प्रचंड आनंद झाला होता. इतक्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आजीला घरकुल मिळणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी अन्सार शेख, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गायकवाड, आहेरवाडी सरपंच बबाबाई सोनवणे, भगवान जोरावर, मच्छिंद्र देवरे, शिवाजी जाधव, बापू हंडोरे, सविता शेजवळ, प्रकाश सोनवणे, तुकाराम पैठणकर, शिवसेनेचे गटनेते दत्तू देवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.