साकोऱ्यात घरोघरी आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:00 PM2021-05-03T23:00:14+5:302021-05-04T00:18:15+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग तसेच शिक्षकांच्या वतीने गाव तसेच वाड्या-वस्तीवरील प्रत्येक घरोघरी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग तसेच शिक्षकांच्या वतीने गाव तसेच वाड्या-वस्तीवरील प्रत्येक घरोघरी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात साकोरालगत मुळडोंगरी या छोट्याशा गावात अखंड हरीनाम सप्ताहामुळे कोरोनाच्या रुग्णांनी शतक गाठले होते. त्यामुळे साकोरा गावात देखील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ३० ते ३५ रुग्णांची संख्या झाली होती.
त्यासाठी आरोग्य विभाग व ग्रा.पं. प्रशासनाने या रुग्णांसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र एकही रुग्ण या ठिकाणी न जाता गावात फिरत असल्याने अधिक संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली होती. तसेच याच शाळेत प्रत्येक बुधवारी लसीकरण सुरू करण्यात आले असून आतापर्यंत गावातून ४९६ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य विभाग, आशा सेविका व प्रा. शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका यांची बैठक घेऊन वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी गावात घर ते घर तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
त्यासाठी दोन शिक्षक, एक आशासेविका अशा एकूण आठ टीम बनवण्यात आलेल्या असून त्यांच्या नेमणूक करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीचे पल्स रेट, ऑक्सिजन पातळी तसेच तापमानाची तपासणी केली जात आहे. याद्वारे संशयित रुग्ण आढळल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात येत आहे.