"गृहमंत्री कुणाच्या घरापर्यंत लक्ष ठेवू शकत नाहीत", छगन भुजबळांकडून देवेंद्र फडणवीसांची पाठराखण
By धनंजय रिसोडकर | Updated: February 9, 2024 16:56 IST2024-02-09T16:56:47+5:302024-02-09T16:56:57+5:30
नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना भुजबळ यांनी हे नमूद केले.

"गृहमंत्री कुणाच्या घरापर्यंत लक्ष ठेवू शकत नाहीत", छगन भुजबळांकडून देवेंद्र फडणवीसांची पाठराखण
नाशिक : सध्या फारच भयंकर प्रकार घडत असून डोकेच चक्रावून जाते. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही तेच समजेनासे होऊ लागते. कुणीही खिशातून पिस्तूल काढते, गोळ्या चालवते. किती हे दुर्दैव आहे; पण पोलिस किंवा गृहमंत्री काही कुणाच्या घरापर्यंत लक्ष घालू शकत नाहीत, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एकप्रकारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली.
नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना भुजबळ यांनी हे नमूद केले. पोलिस हे चोऱ्या-माऱ्या, दंगल, गँगवॉर, दहशतवादाच्या घटनांमध्ये लक्ष घालून त्यावर नियंत्रण आणू शकतात. किंवा कुणी सुरक्षा मागितली असल्यास त्याला सुरक्षा देतात. मात्र, या घोसाळकर प्रकरणात दोघे मित्र होते, तर उल्हासनगरच्या घटनेतील गायकवाड हे दोघेही एकमेकांचे भाऊबंद होते. अशी आपापसात काही भांडणे असल्यास त्यात पोलिस किंवा अन्य कुणालाही काही कल्पना नसते, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
वेगवेगळ्या पक्षात असले तरी एकमेकांचे नातेवाईक आणि त्यात भाऊबंदकी असल्यास त्या सर्व बाबी पोलिस तपासाचा भाग आहेत. तुमच्याबरोबर वावरणारी माणसे अचानकपणे असे प्रकार करत असतील तर ते दुर्दैवच आहे. मात्र, हे प्रकार पाहता लायसन्सबाबतचे नियम अधिक कठोर करायला हवेत, असे वाटते. वाईट धंदे असणाऱ्यांना परवाने देऊ नयेत किंवा शस्त्र दिलेली असल्यास ती काढून घेण्याची आवश्यकता आहे. हा मॉरीस तर जेलमध्ये जाऊन आलेला होता, तर त्याला परवाना कसा मिळतो, तेदेखील बघायला हवे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.