दिंडोरीत नर्सरी व्यवसायाला घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 09:51 PM2020-06-19T21:51:35+5:302020-06-20T00:24:42+5:30
कोरोनामुळे ग्राहकच नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या नर्सरी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांनी रोपे बुक केली ते ग्राहक नर्सरीकडे येत नसल्यामुळे नर्सरी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन ते अडीच महिन्यांत एक ते सव्वा कोटी रुपयांची रोपे नर्सरी व्यावसायिकांना फेकून द्यावी लागली आहेत.
लखमापूर : कोरोनामुळे ग्राहकच नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या नर्सरी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांनी रोपे बुक केली ते ग्राहक नर्सरीकडे येत नसल्यामुळे नर्सरी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन ते अडीच महिन्यांत एक ते सव्वा कोटी रुपयांची रोपे नर्सरी व्यावसायिकांना फेकून द्यावी लागली आहेत.
तालुक्यात शंभर ते दीडशेच्या जवळपास नर्सरी आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाने नियोजित लागवड थांबविल्याने नर्सरीत रोपे घ्यायला कुणी आले नाही. त्यामुळे व्यावसायिकांना यंदाच्या हंगामातील तयार रोपे फेकून द्यावी लागली. परस्परांवर अवलंबून असलेले शेतीचे जणू पूर्ण नियोजनच कोलमडले आहे. नर्सरीतील मजुरांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. रोजंदारीवर काम करीत होते; परंतु नर्सरीकडे कोणीही ग्राहक येत नसल्यामुळे या मजुरांची रोजंदारी कशी द्यायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे शेतमालाला दर नाही. शेतीच नाही तर रोपे घेणार कोण? कोरोनाचे दुष्टचक्र यंदा नर्सरी व्यवसायाला भोवले आहे. नर्सरित रोपे पडून असल्याने ती फेकून द्यावी लागली. दिंडोरी तालुक्यातील नर्सरीचालकांचे सुमारे एक ते सव्वा कोटीचे नुकसान झाले असल्याचे बालाजी नर्सरीचे संचालक माधव पाचोरकर यांनी सांगितले. नर्सरी व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केल्याने मजूरवर्गास घराची वाट धरावी लागली.
लॉकडाऊनमुळे बऱ्याच भागातील आठवडे बाजार बंद झाले. बाजार समित्या सुरू असल्या तरी ग्राहक नसल्याचे कारण देत व्यापारी भाजीपाला खरेदी करीत नव्हते. खरेदी केला तरी योग्य दर मिळत नव्हता. यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला. नवीन लागवड न झाल्याने नर्सरी व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे मजूर मिळत नाही. शिवाय भाजीपाल्याला ग्राहक नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे दोन ते तीन महिन्यांपासून शेतमालाला दर नाही. झालेला खर्च भरून निघाल नाही. त्यात लागवडीसाठी पैसा कुठून आणायचा. परिणामी रोपांची लागवड केली नाही.
- सुधाकर घुले, शेतकरी, मावडी
प्रथमच नर्सरी व्यवसायावर इतकी वाईट वेळ आली आहे. मजुरांचा पगार, बॅँकेचे व्याज व हप्ते, बियाणे, खते, पावडर, कोकोपीट, रोपांसाठी लागणारे ट्रे, वीजबिल व इतर खर्च कसा फेडायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
- संजय सानप, दिंडोरी