अंगणवाडीतील बालकांना घरपोच पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 08:35 PM2020-03-20T20:35:06+5:302020-03-20T20:36:34+5:30
दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. अंगणवाड्या बंद केल्याने कुपोषित बालकांच्या उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडीतील सव्वातीन लाख बालकांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्नअखेर मिटला असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्तांनी पुढील एक महिन्यासाठी अंगणवाडीतील बालकांना तसेच स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक घरभेटी देऊन बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त केले आहे.
या संदर्भात दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. अंगणवाड्या बंद केल्याने कुपोषित बालकांच्या उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडीतील सव्वातीन लाख बालकांचे आरोग्य अंगणवाड्या बंद झाल्याने धोक्यात आले असून, यातील काही बालके कुपोषित असल्याने त्यांच्या उदरभरणाचा त्याचबरोबर औषधोपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव टाळण्यासाठी सरकारने शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यांना सरकारने सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे अंगणवाड्यातील बालकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. शहरी व ग्रामीण भागातील तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना अंगणवाडीत पोषण आहार व औषधोपचार केला जातो. या बालकांची नियमित आरोग्य तपासणी त्याचबरोबर वेळेवर पोषण आहार देऊन त्यांचे वजन वाढविण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणही दिले जाते. या बालकांमध्ये प्रामुख्याने कुपोषित बालकांना अधिक समावेश असल्याने अंगणवाड्या बंद केल्याने त्यांच्या कुपोषणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती