येवल्यात २७ व्यक्तींना होम क्वॉरण्टाइनचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:49 PM2020-04-26T23:49:26+5:302020-04-26T23:49:38+5:30
कोरोना बाधित महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना येवला येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून, रुग्ण परिसरातील २७ नागरिकांना सुरक्षिततेसाठी होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
येवला : कोरोना बाधित महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना येवला येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून, रुग्ण परिसरातील २७ नागरिकांना सुरक्षिततेसाठी होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शहरातील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९ नातेसंबंधितांना यापूर्वीच नाशिक येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. तसेच रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेल्या चौघांना बाभूळगाव (ता. येवला) येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. याबरोबरच रुग्ण परिसरातील २७ नागरिकांना सुरक्षिततेसाठी होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.
येवला नगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला असून, बुधवारपासून (दि.२९) सामान्य नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार किराणा, भाजीपाला, फळे व इतर आवश्यक वस्तू विक्रेत्यांच्या माध्यमातून घरपोच पुरविण्यात येणार आहे.
नगरपालिका हद्दीतील मेडिकल/आवश्यक दुकाने (विंचूर चौफुली हद्दीतील) सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या कालावधीत बुधवारपासून (दि.२९) सुरू राहणार आहेत. खासगी दवाखान्यालगत असलेले मेडिकल खासगी डॉक्टरांच्या ओपीडीच्या वेळेनुसार चालू राहणार आहेत. पिठाची गिरणी व दैनंदिन दूधपुरवठा सकाळी ६.०० ते ८.०० व सायंकाळी ६.०० ते ८.०० या कालावधीत चालू राहील.
येवला उपविभागाचे उपविभागीय अधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असून, येवला उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार मालेगाव उपविभागीय अधिकारी शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. आपत्कालीन परिस्थिती व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येवला उपविभागासाठी तातडीने स्वतंत्र उपविभागीय अधिकारी देण्याची मागणी केली जात आहे.
शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने जंतुनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली होती. मात्र, कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने पुन्हा प्रतिबंधात्मक क्षेत्रात व बफर झोनमध्येही जंतुनाशक फवारणी, नियमित स्वच्छता व विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी नगरपालिकेचे २५० कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
- संगीता नांदूरकर, मुख्याधिकारी, नगरपालिका