मुखपृष्ठाने पुस्तकाचा मूड पकडला पाहिजे : मुकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:05 AM2018-09-08T01:05:27+5:302018-09-08T01:05:43+5:30
लेखकाने दिलेल्या चित्रकल्पनेपेक्षा चित्रकाराने स्वत: हस्तलिखिताचे वाचन करून मगच चित्र काढणे महत्त्वाचे असते. मुखपृष्ठाने पुस्तकाचा मूड पकडला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार व मुखपृष्ठाकार रवि मुकुल यांनी केले. ‘लेखक तुमच्या भेटीला’च्या उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.
नाशिक : लेखकाने दिलेल्या चित्रकल्पनेपेक्षा चित्रकाराने स्वत: हस्तलिखिताचे वाचन करून मगच चित्र काढणे महत्त्वाचे असते. मुखपृष्ठाने पुस्तकाचा मूड पकडला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार व मुखपृष्ठाकार रवि मुकुल यांनी केले. ‘लेखक तुमच्या भेटीला’च्या उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी शंकराचार्य संकुल येथे हा कार्यक्रम पार पडला.
‘मुखपृष्ठाची गोष्ट’ या विषयावर त्यांनी आपले आजवरचे अनुभव सांगितले. ते पुढे म्हणाले, वाचनाची व चित्रकलेची आवड असल्याने मी या क्षेत्रात आलो. चित्रकार हा वाचक असला तर त्याच्या मुखपृष्ठात अस्सलपणा उतरू शकतो. अन्यथा पुस्तकाचा विषय एक आणि मुखपृष्ठ भलतेच असा प्रकार होतो. पूर्वीचे लेखक चित्रकाराला चित्रकल्पना द्यायचे. त्यावर चित्रकार मुखपृष्ठ करून मोकळे व्हायचे. मधल्या काळात प्रभाकर कुलकर्णी, दिनानाथ दलाल, सुभाष अवचट अशा अनेक चित्रकारांनी मुखपृष्ठाच्या क्षेत्रात क्रांती केली, त्याला न्याय दिला. वाचकांना त्याची दखल घेण्यास भाग पाडले. माझ्या चित्रातून मुखपृष्ठाचा मूड पकडला जाईल, यावर माझा सर्वाधिक भर असतो. त्यासाठी मी अनेक माध्यमे वापरून पाहिली.
दरम्यान, ‘लेखक तुमच्या भेटीला’च्या उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानमालेत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे गुरुवारी (दि.६) सायंकाळी शंकराचार्य संकुल येथे व्याख्यान झाले. त्यांनी ‘माझे विदेश मंत्रालयातील अनुभव’ या विषयावर त्यांनी आपले आजवरचे अनुभव सांगितले.