५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड्स कोरेानात बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:03+5:302021-06-10T04:11:03+5:30
वय वर्ष ५० असलेल्यांची कोरोनाच्या काळात विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. त्यांना अधिक धोका असल्याने अशा होमगार्ड्सना ड्युटी देण्यात ...
वय वर्ष ५० असलेल्यांची कोरोनाच्या काळात विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. त्यांना अधिक धोका असल्याने अशा होमगार्ड्सना ड्युटी देण्यात येऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास ३५० होमगार्ड्सना कोरोनाच्या काळात ड्युटी देण्यात आलेली नाही.
शहर, जिल्ह्यासह ग्रामीण तसेच आदिवासी भागापर्यंत होमगार्ड्सची सेवा महत्त्वपूर्ण ठरली आहे. होमगार्ड म्हणून सेवा करण्यासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून महिला, पुरुष नेांदणीकृत आहेत. जिल्ह्यात जवळपास तीन हजार इतके नोंदणीकृत होमगार्ड्स असून प्राप्त परिस्थितीनुसार त्यांची सेवा घेतली जाते. जिल्ह्याचा एकूण विस्तार पाहता जवळपास अडीच हजार होमगार्ड्सना पटावर घेतले जाते.
--इन्फो---
३०००
जिल्ह्यातील नोंदणीकृत होमगार्ड्स
४७६
महिला होमगार्ड्सची संख्या
३५०
५० पेक्षा जास्त वय असलेले
२४३८
सध्या सेवेत असलेले
--इन्फो--
७५ टक्के लसीकरण
जिल्ह्यातील नोंदणीकृत होमगार्ड्सपैकी जवळपास ७५ टक्के होमगार्ड्सचे लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले असून, पहिला डोस पूर्ण करण्यात आलेला आहे. आता नव्या नियमानुसार त्यांना डोस ८४ दिवसांनंतर मिळणार आहे. काहींचा दुसरा डोस देखील झाला असण्याची शक्यता आहे. लसीकरणाच्या सूचना होमगार्ड्सना देण्यात आलेल्या आहेत.
--इन्फो--
आम्ही जगायचे कसे?
होमगार्ड्सची ड्युटी केल्यामुळे मिळणाऱ्या मानधनातून आर्थिक दिलासा मिळतो. त्यावर बरेच काही अवलंबून आहे. मात्र, आता ड्युटी दिली जात नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. लवकरात लवकर ड्युटी सुरू करावी, अशी अपेक्षा आहे. आता कोरोना नियंत्रणात आला आहे.
- रमाकांत वाघमारे, होमगार्ड
वय जास्त असल्याने कोरानाच्या काळात आम्हाला ड्युटी देण्यात आलेली नाही. शासनाने दखल घेऊन काळजी केली ही चांगली बाब आहे. मात्र, ड्युटी नसल्याने मोबदलाही मिळाला नसल्याने आर्थिक अडचण झाली आहे. ड्युटी नसणाऱ्या ५० वर्षांवरील होमगार्ड्सना आर्थिक मदत दिली असती तर आधार झाला असता.
गोरख रणशूर, होमगार्ड