बहुमान : महाराष्ट्रतील त्र्यंबकेश्वर या एकमेव तीर्थक्षेत्राला ‘प्रसाद’चा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 09:22 PM2018-08-29T21:22:33+5:302018-08-29T21:25:39+5:30
केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत २०१६-१७ साली काही शहरांमधील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांचा समावेश नव्याने करण्यात आला. ही योजना केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाने २०१५मध्ये जाहीर केली.
नाशिक : धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण निधी केंद्र सरकारने उपलब्ध क रून दिला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर या नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी एकूण ३८ कोटींचा निधी केंद्र सरकार देणार आहे. प्रसाद योजनेअंतर्गत स्थान मिळणारे त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रतील एकमेव तीर्थक्षेत्र ठरले आहे.
केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत २०१६-१७ साली काही शहरांमधील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांचा समावेश नव्याने करण्यात आला. ही योजना केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाने २०१५मध्ये जाहीर केली. यावेळी महाराष्ट्रतील एकाही तीर्थक्षेत्राला यामध्ये स्थान मिळालेले नव्हते; मात्र २०१६-१७ साली नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरला स्थान मिळाल्याने हा बहुमान ठरला. यामध्ये विविध राज्यांमधील १२ नवे तीर्थक्षेत्र त्यावेळी निवडले गेले. प्रसाद योजनेअंतर्गत समाविष्ट झालेले राज्यातील हे एकमेव तीर्थक्षेत्र असून, या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकूण ३८ कोंटींचा निधी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविक पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटक सुविधा केंद्र, माहिती केंद्र विकसित केले जाणार आहे. जेणेकरून देशभरातून येणा-या भाविक पर्यटकांना त्र्यंबकेश्वरचे धार्मिक-पौराणिक महत्त्व, परिसरातील धार्मिक पर्यटनस्थळे आदींविषयीची माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत होईल, असे राज्य पर्यटन महामंडळाचे नाशिक प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
देशभरातील या तीर्थक्षेत्रांचा समावेश
अयोध्या (उत्तरप्रदेश), बद्रीनाथ (उत्तराखंड), बेल्लूर (पश्चिम बंगाल), देवघर (झारखंड), गुरूवय्यूर (केरळ), हजरत बल व कटरा (जम्मू- काश्मिर), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश), सोमनाथ (गुजरात), सिरिसैलाम व तिरुपती (आंध्रप्रदेश), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र ) या १२तीर्थक्षेत्रांचा नव्याने २०१६-१७ साली प्रसाद योजनेत समावेश करण्यात आला. तत्पुर्वी २०१५ साली देशभरातील विविध राज्यांमधील १२ तीर्थक्षेत्रांचाही समावेश या योजनेत झाला होता;मात्र त्यावेळीदेखील महाराष्ट्रतील कोणत्याही तीर्थक्षेत्राला स्थान मिळालेले नव्हते. या योजनेत सध्या २४ तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर हे त्यामधील एक तीर्थक्षेत्र आहे.