स्वच्छता दक्ष महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:12 AM2017-08-22T00:12:40+5:302017-08-22T00:12:57+5:30
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने ओला व सुका कचºयाचे विलगीकरण करून तो स्वतंत्र डब्यातून घंटागाडीत कर्मचाºयांकडे देणाºया दक्ष महिलांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
मनपाच्या सिडको आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत असून, या संकल्पनेतूनच ज्या महिला या त्यांच्या घरातील कचºयाचे ओला व सुका कचरा असे विलगीकरण करून तो स्वतंत्र डब्यातून घंटागाडीत टाकतील, अशा नागरिकांचा सत्कार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मनपा विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको आरोग्य विभागाचे प्रमुख रमेश गाजरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, अशा महिलांचा नुकताच मनपा विभागीय कार्यालयात दक्ष महिला आरोग्य सेवा सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
पूर्वी नागरिक हे ओला व सुका कचरा हे एकत्रितच घंटागाडीत टाकत होते, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे मनपाने आता ओला व सुका कचºयाचे स्वतंत्र असे वर्गीकरण करावे याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले असून, यासाठी नवीन घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा टाकण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यास नागरिकांचाही सहभाग मिळत असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले. सिडकोतील ज्या महिला घंटागाडीत ओला व सुका कचरा असे विलगीकरण करून कचरा घंटागाडीत टाकतात अशा प्रत्येक प्रभागातून पाच महिलांचा मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी सुनीता कुमावत याच्या हस्ते ‘स्वच्छता दक्ष महिला आरोग्यसेवा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, राजेंद्र महाले, श्यामकुमार साबळे, राकेश दोंदे, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, संगीता जाधव, संगीता आव्हाड, सिडको आरोग्य विभागाचे प्रमुख रमेश गाजरे, रवि जाधव, दीपक लांडगे यांसह स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.