‘आयएसओ’ ग्रामीण पोलीस ठाण्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 04:38 PM2018-08-16T16:38:31+5:302018-08-16T16:43:27+5:30
जनसामान्यांशी निगडित सरकारी, खासगी संस्था कार्यालये, उद्योगांना उत्कृष्ट व तत्पर सेवेसेठी आयएसओ मानांकन दिले जाते. गुन्हेगारी नियंत्रण, गुन्ह्यांची उकल, प्रलंबित प्रकरणे, कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्थ, तक्रारदारांना मिळणारी वागणूक, कामकाजातील शिस्त आदी बाबींवर लक्ष
नाशिक : ग्रामीण पोलीस दलातील ‘आय.एस.ओ’ मानांकन प्राप्त पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांना स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते ग्रामीण पोलीस दलाच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
जनसामान्यांशी निगडित सरकारी, खासगी संस्था कार्यालये, उद्योगांना उत्कृष्ट व तत्पर सेवेसेठी आयएसओ मानांकन दिले जाते. गुन्हेगारी नियंत्रण, गुन्ह्यांची उकल, प्रलंबित प्रकरणे, कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्थ, तक्रारदारांना मिळणारी वागणूक, कामकाजातील शिस्त आदी बाबींवर लक्ष देत जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालये व पोलीस ठाण्यांनी या मानांकनासाठी दावा केला होता. त्यानुसार आयएसओ मानांकन समितीने पोलीस ठाण्यांना प्रत्यक्ष भेट देत निकषांनुसार पडताळणी केली. नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक कार्यालय मालेगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळवण उपविभाग, पेठ उपविभाग या चार कार्यालयांसह मालेगाव तालुका, शहर, येवला शहर, सिन्नर, देवळा, पेठ अशा सहा पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळविण्यास यश आले. याबद्दल महाजन यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयात पोलीस ठाणे प्रमुखांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक करपे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कारभार अधिक लोकाभिमुख होणार
तसेच राज्यभरातील पोलीस प्रशासनाचा कारभार अधिकाधिक लोक ाभिमूख व्हावा, या उद्देशाने राज्याचे पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस कार्यालयांना संकेतस्थळ तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण पोलीस दलाकडूनही नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे लोकार्पण या सोहळ्याप्रसंगी महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या संकेतस्थळावरून ग्रामीण पोलिसांची इत्यंभूत माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.