जनसेवेसाठी स्वत:ला इमानदारीने झोकून द्या : सिंह
By admin | Published: July 10, 2017 12:55 AM2017-07-10T00:55:54+5:302017-07-10T00:56:08+5:30
नाशिक : पोलीस अधिकारीपदी निवड झाल्याने जनसेवेची चांगली संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पोलीस अधिकारीपदी निवड झाल्याने जनसेवेची चांगली संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे़ त्यासाठी स्वत:ला इमानदारीने झोकून द्या, पोलीस दलातील उपलब्ध संधीचा पुरेपूर व सुयोग्य वापर करा, असे प्रतिपादन राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीत शुक्रवारी (दि़ ३०) झालेल्या २५ व्या सत्रातील पोलीस उपअधीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते़ यावेळी सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी म्हणून विक्र ांत गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.
त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीत २५व्या सत्रातील १४ पोलीस उपअधीक्षकांचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी पार पडला़ अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) एस. जगन्नाथन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अधिकाऱ्यांनी स्वत:चे कर्तव्य, अर्थ व आरोग्य यांचे योग्य नियोजन करावे तसेच गैरमार्गाचा वापर टाळून आई-वडील व राष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी़ यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस अधीक्षक संजय दराडे, डॉ़ पंजाबराव उगले, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदींसह अधिकारी उपस्थित होते. आभार सहसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी मानले.