सरपंच, उपसरपंचांना मानधन; सदस्यांना केवळ बैठक भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:16 AM2021-02-16T04:16:06+5:302021-02-16T04:16:06+5:30
नाशिक : गावचा कारभार हाकणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांच्या मानधनात २०१९ मध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे त्यांना सन्मानजनक मानधन मिळू लागले ...
नाशिक : गावचा कारभार हाकणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांच्या मानधनात २०१९ मध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे त्यांना सन्मानजनक मानधन मिळू लागले आहे. सरपंचाबरोबरच उपसरपंचांना देखील मानधन मिळू लागले असले, तरी सदस्यांना मात्र बैठक भत्ताच दिला जातो. गावच्या लोकसंख्येनुसार माधनाची रक्कम ठरविण्यात आली असून सुधारित नियमाप्रमाणे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना मिळणारे मानधन बँकेत जमा केले जाते.
लोकसंख्येच्या निकषानुसार सरपंचाला महिन्याला तीन ते चार हजार रुपयांपर्यंत मानधन वाढविण्यात आले आहे. उपसरपंचाला देखील लोकसंख्येनुसार १ ते २ हजार रुपये मानधन दिले जात आहे. यापूर्वी केवळ सरपंचांनाच मानधन मिळत होते. जुलै २०१९ पासून सुधारित नियमानुसार लाभ दिला जात आहे. दोन हजारांपर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचाचे मानधन एक हजारांऐवजी आता ३ हजार, आठ हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचाला १५०० इतके मानधन मिळत होते ते आता चार हजार आणि आठ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी दोन हजारांऐवजी पाच हजार रुपये, असे मानधन वाढविण्यात आले आहे.
उपसरपंचाला लोकसंख्येच्या निकषानुसार अनुक्रमे एक, पंधराशे आणि दोन हजार असे मानधन मिळते. ग्रामपंचायतींच्या बैठकांना उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना बैठक भत्ता दिला जातो. त्यांना मानधन मिळत नाही.
--इन्फो--
५६५ निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती
४,२२९, निवडून आलेले सदस्य
३७३ सरपंच
--इन्फो--
सरपंच काय म्हणतात...
सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा असला तरी पोलीस पाटलापेक्षा सरपंचांना लोकसंख्येनुसार दिले जाणारे मानधन कमी आहे. सर्वच सरपंचांना सरसकट दहा हजार मानधन मिळणे अपेक्षित आहे. शेतीकाम, घरकाम सांभाळून गावासाठी फिरावे लागते. त्यानुसार मानधनाचा विचार करावा. सदस्य आणि उपसरपंचांनाही अपेक्षित मानधन मिळावे.
- संगीता घुगे, सरपंच, राहुरी.
लोकसंख्येनुसार सध्या मिळणारे मानधन कमी आहे. गाव छोटे असो की मोठे सरपंचांना कामानिमित्ताने पंचायत समिती,जिल्हा परिषदप्रसंगी मंत्रालयातही जावे लागते. आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या सरपंचांना तर अनेक अडणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे लोकसंख्येचा निकष न लावता सरसकट दरमहा दहा हजार रुपये मानधन मिळावे. उपसरपंचांना पाच हजार रुपये मिळावेत तर सदस्यांना दरमहा एक हजार तरी मानधन मिळावे.
- बाळासाहेब म्हस्के, सरपंच, कोटमगाव
सरपंचांच्या मानधानात वाढ करण्यात आली असली तरी ती पुरेशी नाही. सदस्यांना केवळ बैठक भत्ता दिला जातो. त्यांनाही मानधन सुरू केले पाहिजे. लोकसंख्येनुसार मिळणारे मानधन असले तरी कामासाठी लागणारा वेळ आणि खर्च हा मोठ्या ग्रामपंचायतीसारखाच लागतो. त्यामुळे सर्वच सरपंच, उपसरपंच मानधन वाढवून दिले पाहिजे. सदस्यांनाही मानधन मिळाले पाहिजे.
- भाऊसाहेब म्हैसधुणे, सरपंच मुंगसरे.